दहीहंडीला डिजेवाले संपावर, नाही वाजवणार गाणं

  'डिजेवालेबाबू मेरा गाना बजाओ', 'आवाज वाढव डिजे तुला आयची शपथ्थ हाय'  म्हणत डिजेच्या तालावर थिरकराणाऱ्यांसाठी दु:खाची बातमी आहे. कारण ऐन दहीहंडीच्या सणावर तुमच्या लाडक्या 'डिजेवाला बाबू'कडून तुमच्या आवडीच गाणंच ऐकायला मिळणार नाहीए. आणि 'आयची शपथ' दिली तरी आवाजही वाढणार नाहीेए. कारण डिजे संघटनांकडून यादिवशी 'राज्यव्यापी मूक दिन' पाळला जाणार आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Aug 12, 2017, 09:51 AM IST
दहीहंडीला डिजेवाले संपावर, नाही वाजवणार गाणं title=

मुंबई :  'डिजेवालेबाबू मेरा गाना बजाओ', 'आवाज वाढव डिजे तुला आयची शपथ्थ हाय'  म्हणत डिजेच्या तालावर थिरकराणाऱ्यांसाठी दु:खाची बातमी आहे. कारण ऐन दहीहंडीच्या सणावर तुमच्या लाडक्या 'डिजेवाला बाबू'कडून तुमच्या आवडीच गाणंच ऐकायला मिळणार नाहीए. आणि 'आयची शपथ' दिली तरी आवाजही वाढणार नाहीेए. कारण डिजे संघटनांकडून यादिवशी 'राज्यव्यापी मूक दिन' पाळला जाणार आहे.

वाढलेल्या ध्वनीप्रदुषणामुळे लाऊडस्पीकर वापरावर अनेक निर्बंध लादण्यात येत आहेत. त्यामुळे डिजे व्यवसायाशी संबधित असलेल्यांच्या रोजगारावर याचा मोठा परीणाम झाला आहे.  १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन आणि दहीकाला एकाच दिवशी असले, तरी याच दिवशी राज्यातील प्रकाश आणि ध्वनी व्यावसायिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘प्रोफेशनल ऑडियो अँड लायटिंग असोसिएशन’या संघटनेने (पाला) राज्यव्यापी मूक दिन पाळण्याचा निर्णय घेतला आहे. कायद्याचा चुकीचा अर्थ लावल्याने होणाऱ्या समस्यांविरोधात स्वातंत्र्य दिन व दहीहंडी उत्सवादिवशी लाउडस्पीकर व लायटिंग बंद ठेवणार असल्याचे ‘पाला’ने मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले.

लाऊडस्पीकरच्या उद्योगावर भवितव्य अवलंबून असणारी अनेक कुटुंबे आहेत. मात्र राज्यातील लाऊडस्पीकरच्या बंदीमुळे प्रकाश, ध्वनीशी संबधित असलेला हा उद्योग अडचणीत सापडला आहे. ७५ डेसिबलचे बंधन पाळण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र आयोजकांकडून आवाज वाढवण्याचा आग्रह असतो. तो मोडला, तर नाराजी पत्करावी लागते. वाहतुकीच्या आवाजांसह वातावरणातील ध्वनीची पातळी वाढत आहे, त्यामुळे ध्वनी व्यावसायिकांसमोर मोठा पेच निर्माण होतो.  त्यामुळे या निर्णयावर पुनर्विचार व्हावा, अशी मागणी ‘पाला’संघटनेने केली आहे. राज्यातील लाउडस्पीकर बंदीमुळे ध्वनी व प्रकाश उद्योगाच्या भविष्यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लाऊडस्पीकरसाठी परवाना दिला जात नाही, तसेच परवानगी देतानाही पोलिसांकडून अडवणूक केली जाते, असा आरोप पालाचे अध्यक्ष रॉजर ड्रेगो यांनी केला आहे.

दहीहंडी उत्सवामध्ये राजकीय पक्ष व त्यांच्या नेत्यांचा पुढाकार असतो, त्यामुळे लाऊडस्पीकर लावण्यासाठी दबाव आणण्याची शक्यता असली, तरीही आम्ही मागे हटणार नसल्याचे‘पाला’ संघटनेने यावेळी सांगितले.