देशात सर्वाधिक काळ सत्तेत राहिलेल्या कॉंग्रेस (Congress) पक्षाला गेल्या काही दिवसांपासून उतरती कळा लागली आहे. पक्षाध्यक्षांच्या नियुक्तीपासून अंतर्गत कलहांपर्यंत कॉंग्रेस पक्ष सातत्याने चर्चेत आहे. कॉंग्रेस पक्षाला सध्या अध्यक्ष नसल्याने जेष्ठ नेत्यांनीच पक्षनेतृत्वावर सातत्याने टीका केली आहे. त्यामुळे पक्षाला उतरती कळा लागल्याची चर्चा सध्या सुरु आहे
पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी यासह सर्वच मुद्द्यांवर झी 24 तासचे संपादक निलेश खरे यांनी घेतलेल्या स्फोटक मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे.
"2019 साली भाजपने कॉंग्रेसमुक्त करण्यासाठी साम दाम दंड भेद वापरुन कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना दोन तीन महिन्यांच्या कालावधी फोडले. कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या विचाऱ्यांच्या नेत्यांवर आघात केला. त्यामुळे पुन्हा जर भाजपचे सरकार आलं आणि देवेंद्र फडणवीस पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले तर दोन्ही पक्षांना शिल्लक ठेवणार नाहीत. सत्तेचा,पैशांचा प्रचंड दुरुपयोग करुन आणि दिल्लीतून संस्थांचा वापर करुन दोघांना शिल्लक ठेवणार नाहीत," असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
भाजपने पाच वर्षे घातलेल्या धुमाकुळानंतर आमचं मत बदललं
"2014 साली तीन पक्षांचे सरकार स्थापन होईल अशीच परिस्थिती होती कारण तसे आकडे होते. त्यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याची ऑफर होती.शिवसेनेबाबत असलेल्या ग्रहामुळे त्यावेळी मी स्वतःच बोललो की हे शक्य होणार नाही. थेट दिल्लीला काही लोकांनी प्रस्ताव पाठवला असेल तर मला माहिती नाही. भाजपने पाच वर्षे घातलेल्या धुमाकुळानंतर आम्ही आमचं मत बदललं," असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
भाजपला रोखण्यासाठी आखलेली निती कॉंग्रेसच्या मुळावर उठली का?
"महाविकास आघाडीमध्ये आम्ही सर्वात छोटा पक्ष होतो आणि महाराष्ट्राने तीन पक्षांचे सरकार यापूर्वी कधी पाहिले नव्हते.त्यामुळे दोन पक्षाचे सरकार चालवता अनेक अडचणी येत होत्या आणि त्या मी अनुभवल्या आहेत. तीन पक्षाचे सरकार कसे चालवायचे याबाबत शंका होती. पण आम्ही किमान समान कार्यक्रम केला आणि प्रयोग केला.अडीच वर्षे चांगल्या प्रकारे सरकार चाललं," असेही चव्हाण म्हणाले.
नरेंद्र मोदी यांचा पराभव करणं सोपं नाही
"नरेंद्र मोदी यांचा पराभव करणं सोपं नाही. त्यांच्या यंत्रणा ताब्यात आहेत आहेत आणि अनेक राज्यात त्यांचे सरकार आहे.धर्मावर आधारीत ते मतं मागत आहेत. या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांचा पराभव करणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर या देशामध्ये लोकशाही दिसणार नाही. त्यामुळे याच निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांचा पराभव केला पाहिजे," असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
"निवडणुकीत मतदान होईल, मतदारांच्या रांगा लागतील, ईव्हीएमची देवाण घेवाण होईल. पण त्यातून जे निष्पन्न होईल ती एकपक्षीय हुकूमशाही असेल.त्यामुळे याच निवडणुकीत हा प्रकार थांबला पाहिजे," असा इशाराही चव्हाण यांनी दिला.
माझं स्पष्ट मत आहे की, कुठल्याही पक्षाला कॉंग्रेसोडून स्वतःच्या ताकदीवर हे करणं शक्य नाही. माझं स्पष्ट मत आहे की, ज्या 63 टक्के लोकांनी मोदींचा पराभव करण्यासाठी मतगान केलं होतं त्यांची गोळाबेरीज करुन सगळ्या विरोधी पक्षांची आघाडी तयार करायला हवी.तसे झाले तर मोदींचा पराभव करणं सोपं होईल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.