सरकार लांबणीवर, नेते शेतकऱ्यांच्या बांधावर

 परतीच्या पावसानं खरीपाच्या पिकांना दणका 

Updated: Nov 3, 2019, 06:35 PM IST
सरकार लांबणीवर, नेते शेतकऱ्यांच्या बांधावर title=

अकोले : परतीच्या पावसानं खरीपाच्या पिकांना दणका दिला आहे. राज्यातील सगळे नेते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत आहेत. पण राज्यात सध्या सरकार अस्तित्वात नसल्यानं शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्यात सरकार अपुरं पडतं आहे.

परतीच्या पावसानं राज्यातल्या शेतकऱ्याला देशोधडीला लावलंय. खरीपाची जवळपास सगळीच पिकं पाण्यात गेली आहेत. राज्यातल्या सत्ता स्थापनेचा गुंता कायम असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यात पिकांच्या नुकसानीची पाहाणी केली. तर उद्धव ठाकरे औरंगाबाद जिल्ह्यातल्या पिक नुकसानीची पाहणी केली. 

आदित्य ठाकरे कोकणाच्या दौऱ्यावर आहेत. सरकार म्हणून शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचं सगळ्याच नेत्यांनी सांगितलंय. नुकसानीचे पंचनामे तातडीनं करावेत. तसंच मदतही तातडीनं देण्याची ग्वाही नेत्यांनी दिली आहे.

राज्यात काळजीवाहू सरकार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मदत मिळण्यास अनेक मर्यादा आहेत. राज्यात लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावं असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. तर पावसाच्या निमित्तानं देवेद्र फडणवीसांना टोला लगावण्याची संधी उद्धव ठाकरेंनी सोडली नाही.

शेतकऱ्यांच्या हातातून जवळपास खरीपाचा हंगाम निघून गेला आहे. शेतकऱ्यांना तातडीनं मदत हवी आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या भल्यासाठी का होईना राज्यातला सत्तास्थापनेचा पेच लवकरात लवकर सुटावा असं वाटू लागलं आहे.