धुळे : मुंबई - आग्रा महामार्गावरील महाराष्ट्र - मध्यप्रदेश सीमेवरील पळासनेरजवळ शिरपूर पोलिसांनी एका कारमधून पाच लाखाची रोकड जप्त केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र आणि पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने धुळे जिल्ह्यातील महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आंतरराज्य सिमेवर तपासणी नाके कार्यान्वित करण्यात आली आहेत.
सहाय्यक पोलीस निरिक्षक अभिषेक पाटील यांच्या पथकाने पळासनेर येथील तपासणी नाक्यावर तपासणी करीत असतांना एका वाहनात बॅगमध्ये पाच लाख रुपयांची रक्कम आढळून आली. ही रोकड जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी दिली.
दरम्यान, ही रक्कम नेमकी कशासाठी घेऊन जात होते, याबद्दल वाहन चालकला विचारणा करण्यात आली. मात्र त्याने समाधानकारक माहिती दिली नाही. त्यामुळे शिरपूर पोलिसांनी ही पाच लाखाची रोकड जप्त केली आहे. ही रक्कम नेमकी कोणाची व कशासाठी घेऊन जात होते याचा तपास करत आहे.