'आम्हाला डिवचणाऱ्यांची सुटका नाही'

या हल्ल्याची परतफेड करणार

Updated: Feb 16, 2019, 05:31 PM IST
'आम्हाला डिवचणाऱ्यांची सुटका नाही' title=

धुळे : जम्मू- काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दात निंदा करत हल्लेखोरांना धडा शिकवण्याचा इशारा दिला. शहीदांचं बलिदान व्यर्थ न जाऊ देण्याच्या प्रतिज्ञा घेणाऱ्या मोदींनी आपल्या याच वक्तव्याचा पुनरुच्चार यवतमाळ, धुळे दौऱ्यातही केला. विविध विकासकामांच्या उदघाटनासाठी पोहोचलेल्या मोदींनी जनतेला संबोधित करत या हल्ल्याची परतफेड करणार असल्याचा इशारा शत्रूंना दिला. 

'एकिकडे देशात दहशतवाद्यांवियीचा प्रचंड संताप देशवासियांच्या मनात खदखदत आहे, तर दुसरीकडे त्याच देशवासियांच्या डोळ्यांत अश्रू आहेत', असं सांगत महाराष्ट्राच्याही सुपुत्रांना वीरमरण आल्याचं मोदी त्यांच्या भाषणात म्हणाले. आपलं सर्वस्व पणाला लावणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांसोबत आपण असल्याचं म्हणत ही वेळ संयमाची, संवेदनशीलतेची, दु:ख व्यक्त करण्याची आहे ही जाणीव करुन दिली. सोबतच त्यांनी देशवासियांच्या आणि शहीदांच्या कुटुंबीयांच्या या अश्रूंचं उत्तर शत्रूला दिलं जाईल, हा मुद्दा प्रकर्षाने मांडला. 

'भारताची, भारतीयांची ही सवयच आहे की आम्ही स्वत:कोणाला डिवचत नाही. पण, मी इथे एक मुद्दा अधोरेखित करु इच्छितो की जर आम्हाला कोणी डिवचलं तर मात्र त्याची सुटका नाही' असं मोदींनी ठणकावून सांगितलं. सुरक्षा दलांनी यापूर्वीही अशा भ्याड हल्ल्यांचं सडेतोड उत्तर दिलं असून, यावेळीही ते अशाच प्रकारे उत्तर देणार असल्याचा विश्वास मोदींनी दिला. दहशतवादाच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानवर हल्लाबोल करणं मोदींनी सुरूच ठेवलं असून, आता सरकारकडून नेमकी कोणती पावलं उचलली जाणार याकडेच साऱ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. किंबहुना दहशतवादी संघटनांचं समर्थन करणाऱ्या पाकिस्तानचा नायनाट करण्याचीही मागणी अनेक स्तरांतून करण्यात येत आहे.