कैलास पुरी, झी मीडिया, पुणे : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील (pimpri chinchwad police) पोलीस उपनिरीक्षक (PSI) रातोरात करोडपती झाल्याची माहिती गेल्या दोन दिवसांपासून वाऱ्यासारखी फिरतेय. ऑनलाइन गेम ड्रीम इलेव्हनमध्ये (Dream 11) पोलीस उपनिरीक्षकने 1.5 कोटी रुपयांचे बक्षीस जिंकले आहे. विजेता पोलीस उपनिरीक्षक गेल्या दीड महिन्यांपासून फॅन्टसी क्रिकेट अॅपवर एका टीममध्ये हा गेम खेळत होता. दरम्यान, नशिबाने त्याला साथ दिली आणि संघ पहिल्या क्रमांकावर आला आणि त्याला दीड कोटींचे बक्षिस लागले. पण ही बातमी सगळीकडे पसरल्यानंतर या पोलीस उपनिरीक्षकाच्या अडचणीत वाढ झाली आहे.
सोमनाथ झेंडे असे दीड कोटी रुपयांचे बक्षीस जिंकणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. सोमनाथ झेंडे हे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहे. ऑनलाइन गेम ड्रीम 11 मध्ये सोमनाथ यांनी 1.5 कोटी रुपये जिंकले, त्यामुळे त्याच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. मात्र आता याप्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड पोलिसांनी घेतला आहे.
सध्या ऑनलाईन गेमिंगमध्ये तरुणाई भरकटत चालली आहे. अशातच अनेकदा फसवणूक ही होते. असं असताना पिंपरी चिंचवडमधील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडेना ड्रीम 11 खेळण्याचा मोह आवरला नाही. मंगळवारी इंग्लंड विरुद्ध बांग्लादेश सामन्यात याच ड्रीम 11 मुळं ते दीड कोटींची जणू लॉटरीचं लागली. दुसरीकडे ते करोडपती झाल्यानं चांगलेच प्रसिद्धीझोतात आले होते. मात्र आता कोट्याधीश झाल्यानंतर झेंडे अडचणीत आले आहेत. कारण पोलीस उपनिरीक्षक झेंडेंची आता पोलिस उपायुक्तांकडून चौकशी होणार आहे. प्रशासकीय तसेच कायदेशीर बाबी तपासून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असं पिंपरी चिंचवड पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलंय. या चौकशीत त्यांच्यावर काही कारवाई होते की हा केवळ कारवाईचा फास ठरतो, हे लवकरच कळणार आहे.
थेट गृहमंत्र्यांकडे तक्रार
पिंपरी-चिंचवड भाजपाचे माजी संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी झेंडेविरुद्ध राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दिली आहे. झेंडे हे कर्तव्यावर असताना ऑनलाइन जुगार खेळत असल्याचा आरोप थोरात यांनी केला आहे. ऑनलाइन जुगार वा गेम यापासून तरुण पिढीला वाचविण्यासाठी शासन व विविध घटकांकडून उपक्रम राबविले जात असताना झेंडे हे ऑनड्यूटी ऑनलाइन जुगार कसा खेळतात, असा सवाल थोरात यांनी केली आहे.