पिंपरीः खेळत्या मुलाला ऊसाचा रस देऊन बोलावलं, नंतर मृतदेहच सापडला! बॉडी पाहून पोलिसही हादरले

Pimpri Chinchwad Crime : पिंपरी चिंचवडमध्ये आठ वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करुन त्याची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पोलिसांयी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे.  

कैलास पुरी | Updated: Feb 26, 2024, 02:39 PM IST
पिंपरीः खेळत्या मुलाला ऊसाचा रस देऊन बोलावलं, नंतर मृतदेहच सापडला! बॉडी पाहून पोलिसही हादरले title=

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : पुण्यासह बाजूच्या पिंपरी चिंचवडमध्येही गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलाचे अपहरण करत अनैसर्गिक कृत्य करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली असून त्याने धक्कादायक खुलासा केला आहे. सुरुवातीला आरोपीने अपघाताचा बनाव करुन वाचण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी सखोल चौकशी केली असता हादरवणारं सत्य समोर आलं. 

पिंपरी- चिंचवडमध्ये आठ वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची हत्या केल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी नराधम आरोपीला वाकड पोलिसांनी अटक केली. पवन पांडे असे आरोपीच आहे. आरोपी पांडेने शनिवारी रात्रीच अल्पवयीन मुलाचे अपहरण करुण त्याची हत्या केली होती. आरोपीने पुण्याच्या पाषाण परिसरात नेऊन त्याच्यावर आधी अनैसर्गिक अत्याचार केले आणि नंतर गळा आवळून हत्या केली.

अटकेनंतर आरोपी पांडे याने सुरुवातीला हा अपघातात झाल्याचा बनाव केला होता. मात्र पोलीस तपासात त्याचं पितळ उघड पडले. नराधम पांडे हा तिथल्या एका रसवंती गृहात तीनच दिवसांपूर्वी कामासाठी आला होता. तर हत्या झालेला अल्पवयीन मुलगा देखील त्याच ठिकाणी खेळत होता. हे पाहून नराधमाने त्याला एकदा ऊसाचा रस दिला. असं करून आरोपी पांडेने अल्पवयीन मुलाशी जवळीक वाढवली आणि शनिवारच्या रात्री साडे आठच्या सुमारास त्याचं अपहरण केलं. 

त्या मुलाला घेऊन पांडे तिथून पुण्याच्या पाषाण तलावालगत गेला. रात्रीच्या काळोखात त्याने  मुलावर अनैसर्गिक अत्याचार केले. त्यानंतर त्याचा गळा दाबून हत्या केली. तोपर्यंत पीडित मुलाच्या कुटुंबियांकडून त्याचा शोध सुरू झाली होता. अखेर रात्री दहा वाजता पीडिताच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. त्यामुळे पोलिसांनीही मुलाचा शोध सुरु केला. त्यावेळी रात्री अकराच्या सुमारास रसवंती गृहाच्या मालकाने पांडेला फोन करून मुलगा गायब झालेल्या मुलाबाबत विचारले. रसवंती गृहाच्या मालकाने गायब मुलाला पाहिलं होतं का? अशी विचारणा पांडेकडे केली. मात्र मला त्याबाबत कल्पना नसल्याचं पांडे म्हणाला.

पोलिसांना मात्र पांडेवर संशय आला होता. त्यामुळे त्यांनी तपासाची चक्र फिरवली आणि परिसरातील सीसीटीव्ही तपासले. पोलिसांनी त्यातून महत्त्वाचा पुरावा मिळाला. सीसीटीव्हीमध्ये पांडे हा अल्पवयीन मुलाला खुणावत असल्याचं आणि मुलगा त्याच्या पाठीमागे चालत निघाल्याचं दिसत होतं. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये पुढे जाऊन दोघे अचानकपणे गायब झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे सकाळी वाकड पोलिसांनी बावधन गाठलं आणि पांडे राहत असलेल्या घरात जाऊन त्याला ताब्यात घेतलं.

पोलिसांच्या चौकशीत सुरुवातीचे तीन तास पांडेने साधं तोंड देखील उघडले नाही. मग पोलिसी खाक्या दाखवताच तो बोलू लागला. माझ्याकडून अपघात झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबियांना काय उत्तर देणार, म्हणून मी मृतदेह पाषाणमध्येचं फेकल्याचं स्पष्टीकरण पांडेने पोलिसांना दिलं. मग पोलिसांनी त्याला विश्वासात घेतलं अन घटनास्थळ गाठलं. तेव्हा पांडेने अपघाताचा बनाव रचल्याचं स्पष्ट झालं. या नराधमाने निष्पाप मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची हत्या केल्याचं उघड झालं आहे. वाकड पोलिसांच्या तपासात पांडेंचे बिंग फुटले. पण या दुर्दैवी घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली आहे.