डोंबिवली : पासपोर्ट मिळवण्यासाठी ठाण्यापर्यंत जायला लागणाऱ्या डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी आहे. डोंबिवलीमध्येच आता पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होणार आहे. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे ही मागणी केली होती. या मागणीला सुषमा स्वराज यांनी प्रतिसाद दिला आहे. डोंबिवलीमध्ये लवकरच पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्यात येईल असं सुषमा स्वराज यांनी पत्राद्वारे कळवलं आहे.
राज्यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर अशा चार ठिकाणी पासपोर्ट ऑफिस आहेत. ठाण्याच्या ऑफिसमध्ये मुंबई वगळून एमएमआर प्रदेश, नवी मुंबई, रायगड, नाशिक, उत्तर महाराष्ट्र एवढा परिसर येत असल्यामुळे ठाण्याच्या ऑफिसवर कामाचा ताण आहे.
ठाणे कार्यालयाअंतर्गत सध्या केवळ तीनच पासपोर्ट सेवा केंद्रे कार्यरत असून त्यापैकी केवळ एकच ठाण्यात, तर एक मुंबईला आणि एक नाशिक येथे आहे. त्यामुळे ठाण्याच्या पुढील डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर या परिसरातील लाखो नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळत रेल्वेने प्रवास करावा लागतो, तसेच पासपोर्ट सेवा केंद्राच्या कमतरतेमुळे ठाण्याच्या सेवा केंद्रावर ताण येऊन अपॉइंटमेंट मिळण्यासही वेळ लागतो. या नागरिकांना डोंबिवलीमध्ये पासपोर्ट मिळायला लागल्यावर दिलासा मिळणार आहे.