ऑनलाईन शाळांना पालक कंटाळेत का? विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी तयार

शाळा सुरु करायची का नाही यावर पालकांचं काय मत आहे हे एका सर्व्हेक्षणातून समोर आलं आहे.

Updated: Jul 14, 2021, 10:41 AM IST
ऑनलाईन शाळांना पालक कंटाळेत का? विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी तयार title=

मुंबई : गेल्या वर्षापासून राज्यात कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान आता कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसतेय. अशातच राज्यातील काही गावं कोरोनामुक्तही झाली आहे. या गावांमध्ये शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान शाळा सुरु करायची का नाही यावर पालकांचं काय मत आहे हे एका सर्व्हेक्षणातून समोर आलं आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने याबाबत सर्व्हेक्षण केलं आहे. या सर्व्हेक्षणातून राज्यातील कोरोनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्यास 81 टक्के पालकांनी होकार दिला आहे. 

राज्यातील 6 लाख 90 हजार 820 पालकांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला होता. यामध्ये यासर्वांनी स्वतःची मतं नोंदवली. विशेष म्हणजे या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या शहरी आणि ग्रामीण भागांतील पालकांची संख्या सारखीच आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांमधून प्रत्यक्ष शिक्षण सुरू करायचं की नाही याबाबतचा निर्णय घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने मतं मागवण्यात आली होती.

एससीईआरटीने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष 

  • मतं नोंदवलेले पालक : 690820
  • ग्रामीण भाग : 305248 ( 44.19%)
  • शहरी भाग : 313868 ( 45.40 %)
  • निमशहरी भाग : 71904 ( 10.41%)

मुलांना शाळेत पाठवण्यास तयार असलेले पालक : 560818

शाळेत पाठवण्यास नकार दिलेले पालक : 130002

सर्वेक्षणात सर्वाधिक प्रतिसाद 9 वी आणि 10 वी या इयत्तेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिल्याचं समोर आलं आहे. त्यांचं प्रमाण 41.54 % इतकं आहे. 15.26 टक्के पालकांची मुलं 11वी आणि 12 वीत शिकतात।

कोरोनामुक्त गावांमध्ये 8 ते 12 चे वर्ग 15 जुलै पासून सुरू करण्यास शिक्षण विभागाने परवानगी दिली आहे. असं असताना इतर वर्गही सुरू करण्याची मागणी शैक्षणिक संस्था तसंच तज्ज्ञांकडून होतेय. यामुळेच पालक आणि शिक्षकांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न या सर्वेक्षणातून करण्यात आला.