शिक्षक घरी, शाळेत एक्क्यावर दुर्री! वर्गात विद्यार्थी घेतायत पत्त्यांचे धडे

Palghar Zilla Parishad School : पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिक्षणाचे कसे तीनतेरा वाजले आहेत, याचं धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे. जिल्हा परिषदेच्या एका शाळेत शिक्षक गैरहजर होते, आणि विद्यार्थी वर्गात चक्क पत्ते खेळत बसले होते. 

हर्षद पाटील | Updated: Sep 28, 2023, 09:11 PM IST
शिक्षक घरी, शाळेत एक्क्यावर दुर्री! वर्गात विद्यार्थी घेतायत पत्त्यांचे धडे  title=

हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर : गणवेशात बसलेले चिमुकले विद्यार्थी. मात्र हातात आणि समोर पुस्तकांऐवजी पत्ते. सोबत खेळायच्या गोट्याही हा धक्कादायक प्रकार आहे तलासरी (Talasari) तालुक्यातल्या सूत्रधार डोंगरपाडा जिल्हा परिषद शाळेतला (Zilla Parishad School). पहिली ते चौथीपर्यंत ही जिल्हा परिषद शाळा आहे. शाळेत एकच शिक्षक आहे. मात्र हा शिक्षक (Teacher) सुट्टीवर गेल्यानं हे चिमुकले विद्यार्थी पत्ते आणि गोट्या खेळण्यात दंग आहेत. शाळेच्या वर्गात बेंच बाजूला करुन हे विद्यार्थी पत्ते खेळतायत. धक्कादायक म्हणजे सुट्टीवर जायचं म्हणून जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकानं एका निवृत्त शिक्षकाला 300 रुपये दिले आणि वर्गावर जायला सांगितलं. मात्र तो बदली शिक्षकही शाळेत न आल्यानं विद्यार्थ्यांनी वर्गातच पत्ते खेळायला सुरुवात केली.. 

तलासरी तालुक्यातील सूत्रधार डोंगरपाडा जिल्हा परिषद शाळा या शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग भरतात. इनमिन चौदा विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात आणि त्यांना शिकवायला एकच शिक्षक आहेत. पण या चौदा मुलांनाही शिकवायचा कंटाळा येत असल्याने गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या शिक्षकाने स्वतः घरी बसून 300 रुपये रोजदारीवर एका निवृत्त शिक्षकाला मुलांना शिकवायला ठेवलं होतं.  पण हा निवृत्त शिक्षकही गैरहजर असल्याने विद्यार्थी वह्या-पुस्तकं सोडून पत्यांचा डाव मांडताना दिसले. 

हा प्रकार झी२४तासनं समोर आणताच तलासरी गटविकास अधिकाऱ्यांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिलेत. अहवाल प्राप्त झाला की योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन गटविकास अधिकाऱ्यांकडून देण्यात आलाय. ग्रामीण भागातला शिक्षणाचा उडणारा खेळखंडोबा हा नेहमीच शासन आणि पालकांसाठी डोकेदुखी आहे. त्यात पालघरसारखे (Palghar) धक्कादायक प्रकार जमीन पातळीवर काय परिस्थिती आहे याचा आरसा आहेत.

पालघर जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार याआधीही समोर आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असल्याचं अनेक वेळा उघड झाला आहे. पण यानंतरही पालघर जिल्हा परिषदेकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने पालघर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य हे रामभरोसेच असल्याचं पुन्हा एकदा उघड झालं आहे. 

एकीकडे सरकार ऑनलाईन शिक्षणासाठी योजना आखतंय, शहरी भागातील अनेक शाळात ऑनलाईन शिक्षणाला सुरुवातही झालीय, दुसरीकडे ग्रामीण भागात मात्र परिस्थिती दयनीय आहे. शिक्षकांच्या कमतरतेमुळे आणि बेफिकीरपणामुळे हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात आहे..