पालघर लोकसभा पोटनिवडणूक : शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपची नवी चाल

पालघर पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपची नवी चाल दिसून येत आहे.

सुरेंद्र गांगण | Updated: May 8, 2018, 02:38 PM IST
पालघर लोकसभा पोटनिवडणूक : शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपची नवी चाल title=

मुंबई : पालघर पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र गावित यांना आयात करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. दरम्यान, राजेंद्र गावित भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. गावित हे आज संध्याकाळी भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काँग्रेसकडून दामोदर शिंगडा यांचे नाव आघाडीवर असल्याने गावित नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपने गावितांची नाराजी पकडत त्यांना गळाला लावल्याची चर्चा आहे. भाजपच्या या भूमिकेमुळे पालघर पोटनिवडणुकीत आता श्रीनिवास वानगा यांच्याविरोधात राजेंद्र गावित असा सामना रंगण्याची शक्यता आहे. 

शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अखेर शिवसेनेनं श्रीनिवास वनगांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना उमेदवार श्रीनिवास चिंतामण वनगा यांनी मोठी शक्तिप्रदर्शनाने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजप खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर भाजप दुर्लक्ष करत असल्याचा वनगा कुटुंबीयांचा आरोप आहे. त्यानंतर वनगा कुटुंबीयांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर शिवसेनेनं श्रीनिवास वनगांना शिवसेनेनं भूमिगत केलं होतं.

भाजप उमेदवार अर्ज भरणार

पालघरमधून कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय भाजप आज घेणार आहे. मात्र, काँग्रेसचे नाराज नेते राजेंद्र गावित यांना आपल्याकडे घेण्यासाठी हालचाली सुरु केल्यात. दरम्यान, उमेदवारी कोणाला द्यायची  यासंदर्भात पालघरमधील भाजप संबंधितांची बैठक सोमवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पार पडली.  १० मे रोजी भाजपचा उमेदवार अर्ज भरणार हे या बैठकीत ठरवण्यात आलंय. जो उमेदवार द्यात तो निवडून आणू असा ठराव पदाधिकाऱ्यांनी एकमतानं केला. त्यामुळे राजेंद्र गावित यांना उमेदवारी मिळणार का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.