पालघरचा फैसला : चीटिंग की व्होटिंग ! कोण जिंकणार?

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा थोड्याच वेळात फैसला होणार आहे.  मात्र, या निवडणुकीवर शिवसेनेने प्रश्नचिन्ह उभे केलेय. 

Updated: May 31, 2018, 12:49 PM IST
पालघरचा  फैसला : चीटिंग की व्होटिंग ! कोण जिंकणार?  title=

मुंबई : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा थोड्याच वेळात फैसला होणार आहे.  मात्र, या निवडणुकीवर शिवसेनेने प्रश्नचिन्ह उभे केलेय. याबाबत पक्षाचे मुखपत्र 'सामना'मधून कोण जिंकणार… चीटिंग की व्होटिंग? पालघरचा आज फैसला, अशा मथळ्याखाली वृत्त दिलेय. त्यामुळे याचीच राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पालघर मतदान यंत्रात घोळ दिसून आला. तसेच अनेक ठिकाणी मतदारांना मतदान करता आले नाही. तसेच मतदानानंतर मतदान यंत्र खासगी गाडीतून नेण्यात आली. त्यामुळे या निवडणुकीमागे संशय व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत  'चीटिंग की व्होटिंग ' असे म्हणत भाजपला डिवचण्याचा प्रयत्न 'सामना'मधून झालाय.

'सामना'ने काय म्हटलेय?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वापरलेला साम-दाम-दंड-भेद, भाजपने खुलेआम केलेले पैशांचे वाटप, निवडणूक आयोग, पोलिसांनी त्याकडे केलेला सपशेल कानाडोळा, ईव्हीएम घोटाळा, एका रात्रीत बदललेली मतदानाची टक्केवारी असा सत्तेचा बेफाम गैरवापर या निवडणुकीत खुलेआम झाला. मात्र मतदान यंत्रे होलसेलमध्ये बंद पडल्यानंतरही पालघरच्या जनतेने अखेरच्या क्षणी मतदानासाठी रांगा लावल्या. त्यामुळे या निवडणुकीत काय होणार? चीटिंग जिंकणार की व्होटिंग याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. 
भंडारा-गोंदियाचाही निकाल लागणार असून ईव्हीएम घोटाळय़ामुळे ४९ जागी झालेले फेरमतदान कोणाच्या विजयावर शिक्कामोर्तब करणार याचीच प्रचंड उत्सुकता आहे.

यांच्यात थेट लढत

पालघरच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा, भाजपचे राजेंद्र गावीत, बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव अशी तिरंगी कांटे की टक्कर झाली तर काँग्रेसच्या दामोदर शिंगडा यांचा प्रचार मात्र पहिल्या टप्प्यापासूनच क्षीण होत गेला. शिवसेनेने पहिल्या टप्प्यातच शहरी भागापासून वाडय़ा-पाडय़ांवर प्रचाराचा दणका उडवून दिला. 

पैशांचे वाटत

डहाणूत खुलेआम पैसे वाटणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना शिवसैनिकांनी रंगेहाथ पकडले. मात्र त्यांच्यावर साधी तक्रारही नोंदवण्यापलीकडे पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यातच मुख्यमंत्र्यांची ‘साम-दाम-दंड- भेद वापरा, मोठा अॅटॅक करा, पण निवडणूक जिंका’ ही ऑडिओ क्लिप शिवसेनेने पालघर येथील उद्धव ठाकरे यांच्या सभेत वाजवून प्रचारात सुरू असलेल्या डर्टी पॉलिटिक्सची पोलखोल केली. पालघरमध्ये ६० ते ६५ टक्के इतके मतदान होईल, असा अंदाज व्यक्त होत असतानाच ते होऊ नये म्हणून यासाठी ‘भंगार’ ईव्हीएमने चोख काम बजावले. मतदानाच्या दिवशी २८८ ईव्हीएम मशीन बंद पडल्या. मतदानाची टक्केवारी ४६.५० वर घसरली, पण एका रात्रीत चमत्कार झाला आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी मतदान ५३.२२ टक्के झाल्याचे जाहीर केले. एका रात्रीत ८२ हजार ७३७ मते वाढली. या टक्केवारीचा झोल? कसा झाला, असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केलाय.