पालघर : येथील लोकसभा पोट निवडणुकीच्या प्रचाराला आता चांगलंच रंग चढला असून आज शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास चिंतामण वाणगा यांच्या प्रचारासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची वसई येथे जाहीर सभा घेणार आहे.तर भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची विरार येथे जाहीर सभा आहे. काँग्रेस चे उमेदवार दामू शिंगडा यांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची जाहीर सभा विरार येथे दुपारी पार पडणार आहे.
या शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी पालघरमध्ये व्यापारी, उद्योजक यांच्याशी सवांद साधणार आहेत. तर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत हे मुख्यमंत्री यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार दाखल करणार आहेत. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत प्रचार शिगेला पोहचला आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडीनं प्रचारात जोर लावला आहे. प्रचाराच्या या रणधुमाळीत आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा होणार आहेत.
उद्धव ठाकरे यांची सभा संध्याकाळी ६ वाजता वसईमध्ये होणार आहे. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभाही संध्याकाळी ६ वाजता विरारमध्ये होणार आहे. वसई विरार पट्ट्यात उत्तर भारतीय मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यापार्श्वभूमीवर भाजपनं योगी आदित्यनाथ यांचा मैदानात उतरवलं आहे. मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेला उद्धव ठाकरे काय उत्तर देतात ते पहावे लागेल.