तुती लागवडीने शेतकऱ्यांना दिला मदतीचा हात

रेशीम उद्योगाने शेतकऱ्यांना सुगीचे दिवस

Updated: Dec 31, 2019, 10:52 AM IST
तुती लागवडीने शेतकऱ्यांना दिला मदतीचा हात title=

मुस्तान मिर्झा, झी मीडिया, उस्मानाबाद : दुष्काळी भाग असलेला उस्मानाबाद जिल्हा आता रेशीम शेतीसाठी ओळख निर्माण करतोय. गेल्या काही वर्षात तुती लागवडीकडे शेतकरी वळलेत. उस्मानाबाद जिल्ह्यात कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या रेशीम शेतीकडे शेतकरी वळत आहेत. अनेक तरूण शेतकऱ्यांनीही या शेतीचा मार्ग अनुसरला आहे. ऊस उत्पादक शेतकरीही रेशीम शेतीकडे वळतायत. विदर्भातून हे लोण आलं. 

उस्मानाबादमधला कळंब तालुका दुष्काळी भाग. मात्र तालुक्याने रेशीम शेतीच्या माध्यमातून यशस्वी वाटचाल सुरू केली आहे. ३७१ शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष रेशीम उत्पादन सुरू झालं आहे. जवळपास २०हून अधिक गावं रेशीमग्राम झाली आहेत. गेल्या ९ महिन्यात ८० टन रेशीम कोषाचं उत्पादन झालं. त्यामुळे जवळपास ६ कोटींची उलाढाल झाली. एकट्या कळंब तालुक्यात तुतीची मोठी लागवड केली जातेय. 

तुती पिकाला जास्त पाणी लागत नाही, त्याच बरोबर दोन महिन्यात हातात चांगली रक्कमही येते. त्यामुळे शेतकरी या शेतीकडे वळलेत. 

अत्यंत कमी खर्चात, कमी पाण्यात, कमी गुंतवणुकीत रेशीम उत्पादन केलं जातं. १ हेक्टर क्षेत्रातून ६६६ मनुष्य दिवस रोजगार निर्मिती होते. एकरी दोन ते तीन लाख रूपये उत्पन्न मिळतं. कमी मनुष्यबळ लागतं. तसंच १०० टक्के अनुदानही तुतीच्या शेतीसाठी मिळतंय. शेतीत करण्यात आलेला खर्चही मनरेगाच्या माध्यमातून परत मिळतोय. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हा तुती पॅटर्न म्हणून नावारूपाला येतोय. 

इथल्या रेशमाला कर्नाटकच्या रामनगर इथल्या बाजारात मानाचं स्थान मिळतंय. धागा काढताना कमी वेस्टेज जात असलेला कोष उत्पादन करणारा माल या भागात तयार होतोय. दुष्काळी भागातल्या शेतकऱ्याला ही शेती फायदेशीर ठरतेय.