नारायण राणेंसमोर आता पुढचे पर्याय काय?

नारायण राणे पुढील दहा दिवसात जाहीर करणार भूमिका

Updated: Aug 22, 2019, 06:00 PM IST
नारायण राणेंसमोर आता पुढचे पर्याय काय? title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : नारायण राणे आपली पुढील भूमिका दहा दिवसात जाहीर करणार असले तरी त्यांच्यासमोर फारसे पर्याय शिल्लक नाहीत. आपला स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलिन करणं हा राणेंसमोर पहिला पर्याय आहे. मात्र भाजप-शिवसेना युती झाली तर शिवसेना राणेंच्या भाजपा प्रवेशाला विरोध करू शकते. अशा वेळी स्वाभिमानचे अस्तित्व कायम ठेवत भाजपबरोबर छुपी युती करणं हा दुसरा पर्याय राणेंसमोर दिसतो आहे.

- काँग्रेसमध्ये परतीची शक्यता नाही
- राष्ट्रवादीच्या बुडत्या जहाजात राणे जाणार नाहीत
- शिवसेनेच्या प्रवेशाची शक्यताच नाही
- भाजपात प्रवेश करण्याचा पर्याय
- अथवा स्वतःच्या पक्षाचे अस्तित्व काय ठेवून निवडणक लढवण्याचा पर्याय

बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक ते मुख्यमंत्री असा राजकारणाचा चढता आलेख अनुभवलेले नारायण राणे सध्या राजकीयदृष्ट्या अडचणीत आहेत. एकेकाळी राजकारणात प्रचंड दबदबा असलेल्या राणेंसमोर राजकीय भवितव्याची चिंता आहे. नारायण राणेंची प्रत्येक राजकीय हालचाल ही राज्यात राजकीय भूकंप घडवणारी ठरली आहे. आताही नारायण राणे काय करणार अशी चर्चा सुरू झाली आहे. जुलै २००५ मध्ये नारायण राणेंनी शिवसेना सोडून काँग्रेसची वाट धरली आणि पहिला राजकीय भूकंप घडवला. या भूकंपाचा धक्का तीव्र होता. 

राणेंबरोबर अनेक आमदार आणि पदाधिकारी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आले होते. त्यानंतर १२ वर्षांनी २०१७ साली राणेंनी काँग्रेस सोडून राजकारणात दुसरा भूकंप घडवला. मात्र या भूकंपाची तीव्रता पहिल्या धक्क्याच्या तुलनेत अगदीच सौम्य होती. यावेळी राणेंबरोबर कुणीही आमदार अथवा बडे नेते नव्हते. काँग्रेस सोडून राणेंनी महाराष्ट्र स्वाभीमानी पक्षाची स्थापना केली आणि राणे भाजपाबरोबर गेले. भाजपाने राणेंना राज्यसभेवर खासदारही केलं. 

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांचा मुलगा निलेश राणे याने महाराष्ट्र स्वाभीमान पक्षातर्फे निवडणूक लढवली. मात्र निलेश राणेंना पराभवाला सामोरं जावं लागलं. लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेनेची युती झाली होती. राणेंना बरोबर घ्यायला शिवसेनेचा विरोध होता. त्यामुळे आताही राणे भाजपात जाणार असतील तर शिवसेना विरोधाची भूमिका घेण्याची शक्यता आहे. 

भाजपा-शिवसेनेत युती होणार नसेल तर राणेंचा भाजप प्रवेशाचा मार्ग सुकर होईल. अन्यथा राणेंना स्वतःच्या पक्षाचं वेगळं अस्तित्व ठेवून पुढील विधानसभा निवडणूक लढवावी लागणार आहे.

खरं तर राणेंचा आक्रमक स्वभावच त्यांना मारक ठरला असं म्हणावं लागेल. समय से पहले और नशीब से ज्यादा कुछ नही मिलता असा मोलाचा सल्ला तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राणेंना दिला होता. हा सल्ला राणेंनी ऐकला असता तर राणेंची राजकीय कारकीर्द आज वेगळ्या वळणावर असती. मात्र राजकारणात जर तर ला काहीही किंमत नसते.