मुंबई : विधिमंडळाचा पहिला दिवस महाविकास आघाडीच्या बहुमतासाठीच्या शिरगणतीने गाजला. विरोधी पक्ष असलेल्या भाजपने केलेल्या सभात्यागाची चर्चा झाली. ३ तांत्रिक बाबी सांगत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांसोबत सभात्याग केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खरे आव्हान असणार आहे. देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते असण्याची शक्यता समोर येत आहे. त्यांच्याकडे विरोधी पक्षनेते पदाचा खूप दांडगा अनुभव आहे. भाजप विरोधी पक्षात असताना त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला अनेक प्रश्नांवरुन धारेवर धरले होते. त्यामुळे महाविकास आघाडीला आता याची काळजी घ्यावी लागणार आहे. दरम्यान रविवारी विरोधी पक्षनेत्याची निवड होणार असे सांगितले जात होते. पण विरोधी पक्ष नेता निवडीचा उल्लेख उद्याच्या कार्यक्रम पत्रिकेत नसल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे उद्या विरोधी पक्ष नेत्याची नियुक्ती होणार नाही. सत्ताधारी पक्षाकडून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी ज्या पद्धतीने आक्रमक भूमिका घेतली ती पाहता विरोधी पक्षाची नियुक्ती लवकर न करण्याची महाराष्ट्र विकास आघाडीची रणनीती असल्याचे सांगण्यात येत आहे. विरोधी पक्ष नेत्याची नियुक्ती आता नागपूरच्या हिवाळी अधिवेशन होणार अशीच चिन्हं आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी राज्यातील तसेच देशभरातील महत्वाचे नेते मंचावर उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नेते चंद्रकांत पाटील हे देखील या सोहळ्याला उपस्थित होते. शपथविधी झाल्यानंतर सर्व मान्यवरांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी फडणवीस आणि पाटील हे शपथविधी झाल्यावर तात्काळ निघून गेल्याचे पाहायला मिळाले. शपथविधी सोहळ्यानंतर दोन तासांच्या आतच देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेत्याच्या भुमिकेत पाहायला मिळाले. त्यांनी महाविकास आघाडीच्या समान किमान कार्यक्रमातील धोरणांवर टीका केली.
माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विट करुन महाविकास आघाडीच्या धोरणांवर टीका केली. महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटचालीत वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्राचा नामोल्लेख नसल्याचे निदर्शनास आणून दिले. या भागांकडे नवे सरकार त्याकडे लक्ष देईल अशी आशा फडणवीस यांनी व्यक्त केली.