शिर्डी : शिर्डी येथील साईबाबा मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी होती. यावेळी गुरुदक्षिणा म्हणून साईंच्या झोळीत 5.12 कोटींची रक्कम जमा झाली आहे. गुरुपौर्णिमा उत्सवात सुमारे तीन लाख भाविकांनी दर्शन घेतले होते.
श्रद्धा आणि सबुरीचा संदेश विश्वाला देणाऱ्या साईबाबांच्या गुरुपौर्णिमा उत्सवात देश-विदेशातून सुमारे तीन लाखांहून अधिक भाविकांनी शिर्डीत येत साई समाधीचे दर्शन घेतले. सुमारे ५ कोटी १२ लाख ४०८ रुपयांची विक्रमी गुरुदक्षिणा साईंना अर्पण केली आहे. यात १२ देशांतील १९ लाख ८० हजार ९४ रुपयांच्या परकीय चलनाचाही समावेश आहे.
देश-विदेशात कोट्यवधी साईभक्त दरवर्षी शिर्डीत दर्शनासाठी येतात. ते श्रद्धेतून बाबांच्या झोळीत भरभरून दानही अर्पण करतात. याच दानातून संस्थानाने पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. साईंच्या आरोग्यसेवेचा मंत्र जोपासण्यासाठी दोन रुग्णालये उभारत गोरगरिबांना उच्च दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली जाते.
साईभक्तांना शिर्डीत निवासासाठी अद्ययावत भक्त निवासेही उभारण्यात आली आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठे सोलार सिस्टिमवर चालणाऱ्या प्रसादालयाची निर्मिती करून दररोज ५० हजारांवर भाविकांना मोफत भोजन प्रसाद दिला जातो. सामान्य मुलांच्या शिक्षणासाठी उच्च दर्जाच्या शैक्षणिक संकुलाची निर्मिती करण्यात आली आहे.
भोजनालयास प्रतिसाद
आशियातील सर्वांग मोठे आणि सोलार सिस्टिमवर चालणाऱ्या साईबाबांच्या भोजन प्रसादालयात गुरुपौर्णिमेनिमित्त तीन दिवसांत दीड लाख भाविकांनी मोफत भोजन प्रसादाचा आनंद घेतला.