मराठा आरक्षणामुळे ओबीसींच्या मनात भीती- प्रकाश आंबेडकर

ही भीती दूर करण्यासाठी कोणताही राजकीय पक्ष प्रयत्न करताना दिसत नाही.

Updated: Jul 11, 2019, 06:17 PM IST
मराठा आरक्षणामुळे ओबीसींच्या मनात भीती- प्रकाश आंबेडकर  title=

नवी दिल्ली: मराठा आरक्षणामुळे ओबीसी समाजाच्या मनात भीती निर्माण झाली आहे, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. ते गुरुवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात भाष्य केले. त्यांनी म्हटले की, मराठा आरक्षणामुळे ओबीसी समाजाच्या मनात भीती निर्माण झाली आहे. मात्र, ही भीती दूर करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा किंवा शिवसेना कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही. त्यामुळे सरकारने अ आणि ब अशी वर्गवारी करून मराठा समाजाला ब वर्गात टाकावे, अशी मागणी आंबेडकर यांनी केली. 

यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. देशभरात आरक्षणावरुन गोंधळ असल्याचे त्यांनी म्हटले. ओबीसी आरक्षण शाबूत ठेवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या हातात सत्ता द्या. तरच देशातील सर्व घटकांचे आरक्षण टिकेल. आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून मराठा आणि ओबीसी समाजाला आरक्षण देऊ, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 

काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा वैध ठरवला होता. त्यानुसार यंदाच्या वर्षापासून मराठा समाजाला शिक्षणात १२ आणि नोकरीत १३ टक्के आरक्षण लागू झाले आहे. दरम्यान, गुरुवारी मराठा विद्यार्थ्यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. वैद्यकीय प्रवेशात यंदापासूनच मराठा आरक्षण देण्यास विरोध करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशात यंदापासूनच आरक्षण मिळणार आहे.