आता जेवा व्हेज 'गद्दार थाळी' आणि '50 खोक्के एकदम ओके' नॉनव्हेज थाळी, कुठे मिळेल वाचा

गद्दार आणि 50 खोके एकदम ओके हे दोन शब्द महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलेच गाजलेत

Updated: Sep 14, 2022, 04:00 PM IST
आता जेवा व्हेज 'गद्दार थाळी' आणि '50 खोक्के एकदम ओके' नॉनव्हेज थाळी, कुठे मिळेल वाचा title=

सचिन कसबे, झी मीडिया, पंढरपूर : राज्यातील सत्तांतरा नंतर 'गद्दार' हा शब्द खूप चर्चेत आला. त्यानंतर झालेल्या राज्याचा पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी '50 खोके एकदम ओके'ची घोषणाबाजी करत सरकारला डिवचलं. त्यानतंर हे दोन शब्द महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलेच गाजले. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात शिंदे गटातल्या आमदारांचा 'गद्दार' असा उल्लेख केला. याला शिंदे गटाकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला. 

गद्दार आणि 50 खोक्के एकदम ओके हे दोन शब्द राज्यात इतके चर्तेत आहेत की त्या नावाचा एका हॉटेल मालकाने चक्क आपल्या हॉटेलमध्ये मिळणाऱ्या थाळीना ती नावं दिली आहेत. पंढरपूरमध्ये रहाणारे बंडू घोडके आणि दत्तात्रय यादव यांचे हे हॉटेल असून ते निष्ठावंत शिवसैनिकही आहेत. आपल्या हॉटेलमधल्या व्हेज थाळीला त्यांनी 40 गद्दार थाळी असं नाव दिलं आहे. तर नॉनव्हेज थाळीला 50 खोक्के एकदम ओके असं नाव दिलं आहे.

विशेष म्हणजे या थाळीची किंमतही त्यांनी तशीच ठेवली आहे. म्हणजे शिवसेनेतील 40 आमदारांनी बंड केलं होतं. त्यामुळे गद्दार व्हेज थाळीची किंमत 40 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. तर 50 खोके घेतल्याचा आरोप असल्याने नॉनव्हेज थाळीची किंमत 50 रुपये इतकी ठेवली आहे. 

शिवसेनेकडून शिंदे गटाच्या आमदारांना सातत्याने गद्दार म्हणून हिणवले गेले. याच गद्दारांच्या नावाने शाकाहारी थाळी तयार झाली. तर विधानसभेच्या आवारात ''50खोके एकदम ओके'' नावाने झालेल्या घोषणावरुन मांसाहरी थाळी तयार करण्यात आली आहे. राज्यातील वेगवेगळ्या थाळ्यामध्ये 40 गद्दार थाळी आणि 50 खोके एकदम ओके थाळी निश्चितच चर्चेचा विषय ठरत आहे.