प्रवीण तांडेकर, झी मीडिया, गोंदिया : शारीरिक सरावादरम्यान सहाव्या वर्गात शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांला शिक्षकाने बेशुद्ध होईपर्यंत काठी आणि पाईपने बेदम मारल्याची धक्कादायक घटना गोंदियातील प्रसिद्ध प्रोग्रेसिव्ह शाळेत घडली आहे. या घटनेमुळे संतप्त पालकांनी शाळा व्यवस्थापनेविरोधात रोष व्यक्त केला आहे. शिक्षकासह शाळा व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी आदिवासी प्रकल्प अधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली असून पोलिसात देखील तक्रार करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
आरटीईच्या नियमातंर्गत देवरी तालुक्यातील मुरपार या गावातील सौरभ रामेश्वर उईके हा गोंदिया प्रेगेसिव्ह इंटरनँशनल शाळेत शिकतो. शाळेचा सकाळच्या शारीरिक सराव सूरू असताना या शाळेतील शिक्षकाने शुल्लक कारणावरून सौरभ या आदिवासी विद्यार्थ्याला काठी आणि प्लास्टिकच्या पाईपने बेशुद्ध होयीपर्यत बेदम मारहाण केली. याची माहिती त्याच्या वडिलांना कळताच त्यांनी शाळेत धाव घेत सौरभला गावी आणलं. विचारपूस केली असता सौरभने शिक्षकाने आपल्या मारहाण केली असल्याचं त्याने घरच्यांना सांगितलं. याची तक्रार त्यांनी देवरी इथल्या आदिवासी प्रकल्प अधिकारी यांना केली. मात्र अनेक दिवस लोटूनही काही कार्यवाही न झाल्याने त्यांनी सरळ धाव पोलीस ठाण्यात घेतली आणि त्या शिक्षकानं विरोधात व शाळा व्यवस्थापना विरुद्ध पोलीस तक्रार केली आहे.
आदिवासी प्रकल्प अधिकारी यांनी या प्रकरनी चौकशीचे आदेश दिलं. चौकशी समितीने केलेल्या तपासात सौरभ याला शिक्षकाकडून मारहाण केल्याचं समोर आल्याने आदिवासी प्रकल्प अधिकारी यांनी शाळा प्रशासनाला पत्र दिलं आहे. शाळा प्रशासनाने दोन्ही शिक्षकांना निलंबित केलं असल्याचे फोनवरून कळवले मात्र अद्याप लेखी पत्र मिळाला नाही. अशी माहिती आदिवासी प्रकल्प अधिकारी यांनी दिली आहे.