औरंगाबाद शहरावर जलसंकट, १५ लाख लोकांचं पाणी बंद होणार

जायकवाडी धरणानं आता तळ गाठला आहे.

Updated: Jul 4, 2019, 08:33 PM IST
औरंगाबाद शहरावर जलसंकट, १५ लाख लोकांचं पाणी बंद होणार title=

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : औरंगाबाद शहरावर मोठं पाणीसंकट उभं ठाकलं आहे. पुढच्या काही दिवसांत पाऊस पडला नाही तर शहरावर आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार आहे. 

औरंगाबाद शहराच्या जवळपास १५ लाख नागरिकांना जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा होता. मात्र जायकवाडी धरणानं आता तळ गाठला आहे. जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणीपुरवठा होतो तिथून तो उपसा होतो. मात्र डावा कालवा आता पूर्णपणे आटलाय. डाव्या कालव्याला जोडणाऱ्या कालव्यातसुद्धा थोडं पाणी आहे. त्यामुळे हे पाणी आटल्यावर शहराला मोठा पाणीप्रश्न भेडसावणार आहे. महापालिकेनं पाण्यावर तरगंते पंप टाकले आहे. मात्र त्यातूनही शहराला पुरेल इतकं पाणी मिळणार नाही. 

शहराची गरज २०० एमएलडीची आहे, मात्र शहराला सध्या १०० एमएलडी इतकंच पाणी मिळतंय. सध्या काही भागात ५ दिवसांआड तर काही ठिकाणी ३ दिवसाआंड पाणीपुरवठा सुरु आहे.

जायकवाडी धरणात नाशिकहून पाणी येतं. मात्र तिकडेही पाणी नसल्यानं भीषण परिस्थिती ओढवल्याचं दिसतंय. त्यात येत्या काही दिवसांत पाऊस आला नाही तर संकट अधिकच गडद होईल. महापालिकाही प्रयत्न करतेय, मात्र आता पावसाशिवाय पर्याय नसल्याचं सांगते आहे. 

मराठवाड्यावर सध्या वरुणराजा रुसलाय. संपूर्ण मराठवाड्यात सध्या सरासरीच्या १२ टक्के इतकाच पाऊस झाला आहे. औरंगाबादला अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. त्यातच पिण्याचं पाणी कमी होणार असल्याने नागरिक धास्तावले आहेत. त्यामुळे वरुणराजा तुझी लवकर कृपा होऊ दे अशी प्रार्थना औरंगाबादचे नागरिक करत आहेत.