प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : रत्नागिरीमधल्या चिपळूण तालुक्यातलं तिवरे धरण फुटलं आणि हाहाकार माजला. यात पोफळी गावातले चार जिवलग मित्र सुद्धा सुटले नाहीत. काळ एखाद्याला आपल्या कवेत कसं घेतो याचं उदाहरण यात पाहायला मिळालं.
सुनिल पवार, रणजित काजवे, राकेश घाणेकर आणि सुमित निकम हे चारही मित्र चिपळूण तालुक्यातल्या पोफळी गावात रहाणारे. तिवरे धरण फुटलं आणि काळाच्या घाल्यात हे चार जण काळाच्या पडद्याआड गेले. तिवरे आणि पोफळी हे ३० किलोमीटरचं अंतर. सुनिल पवार यांचे मित्र चव्हाण यांच्या तिवरे इथल्या घरी जेवणाचा बेत आखला गेला होता. जेवणाच्या निमित्ताने सुनिल पवार, रणजित काजवे, राकेश घाणेकर आणि सुमित निकम हे चौघेही चव्हाण यांच्या धरणाला लागून असलेल्या घरी जेवणासाठी गेले. मात्र हेच जेवण त्यांचा काळ बनून वाट पहात होते.
सुनिल, रणजित, राकेश हे तिघे मोलमजुरी करून पोट भरत होते. यापैकी सुनिल पवार अविवाहित होते. पोफळी गावातल्या एकाच वाडीतले हे चौघे मित्र या दुदैवी घटनेत गेले याचं दुःख, त्यांच्या कुटुंबासह त्यांच्या वाडीतल्या अनेकांना सलतंय. दुर्दैव काय असतं त्याचं उदाहरण, तिवरे गावातल्या या घटनेतून समोर आलंय.