यंदा गटारीला ताटात मासे नाहीच! सुरमई, पापलेट, कोळंबीची किंमत पाहून पळेल तोंडचं पाणी

Fish Price Hike in Mumbai: येत्या सोमवारपासून श्रावण सुरु होत असल्याने येता विकेण्ड हा गटारीचा असणार आहे. त्यामुळे या विकेण्डला मांसाहार करण्याचा प्लॅन असला तरी माशांपासूनच दूरच रहावं लागेल असं चित्र दिसत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 30, 2024, 01:02 PM IST
यंदा गटारीला ताटात मासे नाहीच! सुरमई, पापलेट, कोळंबीची किंमत पाहून पळेल तोंडचं पाणी title=
यंदाच्या गटारीला मासे खाता येणार नाहीत (प्रातिनिधिक फोटो)

Fish Price Hike in Mumbai: आठवड्याभरामध्ये श्रावण सुरु होत असून अनेकजण श्रावणामध्ये मांसाहार करत नाहीत. त्यामुळेच आता किमान आठवडाभर ताटात चिकन आणि मटण दिसेल. मात्र त्यानंतर किमान महिनाभर म्हणजेच श्रावण संपेपर्यंत मांसाहार करणाऱ्यांचं प्रमाण कमी झालेलं दिसेल. सोमवारपासून श्रावण सुरु होत असल्याने शुक्रवार, शनिवार आणि रविवारी अनेक ठिकाणी श्रावण सुरु होण्याआधी केल्या जाणाऱ्या गटारीसंदर्भातील नियोजनांचा सुरुवात झाली आहे. काहीजण ऑफिसमध्ये तर काही घरगुती प्लॅन्सचं जोरदार प्लॅनिंग सुरु असलं तरी यंदाच्या गटारीला ताटामध्ये मासे मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. यामागील कारण म्हणजे माशांचे वाढलेले दर.

थेट श्रावणानंतर माशांवर ताव

सध्या मासेमारी बंद असल्याने आणि मासे बाजारामध्ये मासळीची आवाक कमी होत असल्याने बाजारात मासेच उपलब्ध नाहीत. म्हणूनच मागणी अधिक आणि पुरवठा कमी म्हणून मासे प्रचंड महाग झाले आहेत. मुंबईत सुरमई तब्बल 1 हजार रुपये तर पापलेट 1300 रुपये किलोने मिळत आहे. त्यामुळे आधीच भाज्यांचे दर वाढलेले असतनाच आता मांसाहारही महाग झाल्याचं दिसत आहे. त्यातही आता मासेमारीसाठी बोटी 1 ऑगस्टपासून समुद्रात जातील म्हणजे ताजे मासे स्वस्त दरात मिळवण्यासाठी किमान 15 दिवसांची तरी वाट पहावी लागणार आहे. पण तेव्हा श्रावण असल्याने अनेकांना माशांची भूक आता श्रावणानंतरच शमवता येईल असं चित्र दिसत आहे. 

किती रुपयांना आहेत मासे?

आधी सुरमई 400 रुपयांना मिळायची ती आता हजार रुपयाला मिळत आहे. कोळंबी आधी 380 ला मिळत होती जी आता 600 रुपयांपर्यंत गेली आहे. त्याचप्रमाणे पापलेटची किंमत 800 ते हजार रुपयांवरुन 1300 रुपयांवर पोहोचली आहे. दुसरीकडे बोंबलाची किंमतही 200 ते 250 रुपयांवरुन 700 रुपयांवर पोहोचली आहे. पूर्वी पाच नग बांगड्यासाठी 200 रुपये मोजावे लागायचे आज 3 नगासाठी 200 रुपये आकारले जात आहेत.  वाम 400 ते 500 रुपयांवरुन हजार रुपयांवर तर हलवा 350 ते 400 रुपयांवरुन 800 रुपयांवर पोहचला आहे. रावस आधी 350 ते 400 ला मिळत होता जो आता 800 ला मिळतोय.

मासे पुरवठ्यामध्ये समस्या काय?

सध्या मुंबईमध्ये मासेमारी बंद आहे. मात्र मुंबईत गुजरात, हावडा बंदर, पोरबंदर येथून मासे मुंबईबरोबर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये दाखल होत आहेत. हा सर्व फ्रोझन म्हणजेच आधी साठवून ठेवलेला माल आहे. त्यामुळेच मासे महाग आहेत. रस्ते मार्गानेही मासे मोठ्या प्रमाणात राज्यात येत असल्याने माल पोहचण्यास उशीर लागत आहे. ट्रान्सपोर्टेशनदरम्यान माल खराब होण्याचे प्रमाणही बरेच असल्याने आणि पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था झाल्याने याचा फटका माशांच्या पुरवठ्यावर बसला आहे. पावसाळ्यात मुंबईमध्ये दोन महिने मासेमारी बंद असते. आता ही मासेमारी 1 ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार आहे. 1 जून ते 31 जुलैपर्यंत पश्चिम किनारपट्टीवर, तर 15 मे ते 15 जुलैदरम्यान पूर्व किनारपट्टीवर मासेमारी बंद असते.