#Corona : MPSCसह कोणतीही परीक्षा पुढे ढकललेली नाही- राजेश टोपे

सहा केंद्रांवर होणार परीक्षा 

Updated: Mar 14, 2020, 04:58 PM IST
#Corona : MPSCसह कोणतीही परीक्षा पुढे ढकललेली नाही- राजेश टोपे  title=
संग्रहित छायाचित्र

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर MPSC तर्फे घेण्यात येणारी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा पुढे ढकलली जाईल अशी चर्चा होती. मात्र वेळापत्रकानुसार म्हणजेच रविवार १५ मार्च रोजी ही परीक्षा होणार आहे. ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली नाही. शिवाय राज्यातील कोणतीही परीक्षा पुढे ढकलण्यात आली नसल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

सहा केंद्रांवर होणार परीक्षा 

राज्यातील सहा केंद्रांवर ही परीक्षा होणार असून ९५ हजार उमेदवार या परीक्षेला बसलेले आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या शहरातील परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. विशेष म्हणजे जिथे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत त्या पुण्यात जवळपास ४० हजार म्हणजेच सर्वात जास्त उमेदवार परीक्षा देणार आहेत. 

पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असल्याने येथील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्याच्या केंद्रावर MPSC ची परीक्षा होणार की नाही याची चर्चा होती. मात्र कोणत्याही केंद्रावरील परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळण्याचं आवाहन सरकारने केलेलं आहे. त्यामुळे या परीक्षेचं काय होणार अशी चर्चा सुरू होती. तर, ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी होत होती, मात्र तसा कोणताही निर्णय MPSC अथवा शासनाने घेतलेला नाही. 

गर्दीच्या ठिकाणी काळजी घ्या... 

परीक्षेचं वेळापत्रक पाहता परीक्षा केंद्रावर गर्दी होणार आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ४० हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. अनेक परीक्षार्थी हे आदल्या दिवशीच म्हणजे शनिवारी येण्याची शक्यता असल्याने दोन-तीन दिवस ही गर्दी कायम राहू शकते. त्यातच परीक्षार्थींची परीक्षा केंद्रांवर बायोमेट्रीक हजेरी तपासण्यात येणार आहे. या परिस्थितीत करोना विषाणूचा प्रसार होऊन, करोनाची लागण होऊ शकते. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी उमेदवारांनी केली होती. पण, आता मात्र परीक्षा निर्धारित वेळेतच पार पडणार असल्यामुळे गर्दीच्या ठिकाणी परिक्षार्थींनी प्रतिबंधात्मक उपायांची मदत घेत काळजी घ्यावी.