नागपुरातील ऑक्सिजन तूडवडा दूर करण्यासाठी हवाई दलाची मदत

येत्या तीन दिवसात ऑक्सिजन घेऊन नागपुरात हे टँकर परतील

Updated: May 6, 2021, 09:42 AM IST
नागपुरातील ऑक्सिजन तूडवडा दूर करण्यासाठी हवाई दलाची मदत title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. असं असताना ऑक्सिजनचा तुटवडा देखील मोठ्या प्रमाणात जाणवला. नागपुरात देखील कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे. नागपुरात 4399 कोरोनाबाधित रूग्ण वाढले असून 7400 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 82 जणांचा  कोरोनाने बळी घेतला. शहरात 48 ,ग्रामिणमध्ये 22 आणि जिल्ह्याबाहेरील 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

नागपुरातील ऑक्सिजन तूडवडा दूर करण्यासाठी हवाई दलाची मदत घेण्यात आली आहे. काल रात्री नागपूर विमानतळावरून  चार ऑक्सिजन टँकर  हवाईदलाच्या गजराज या विशेष विमानाने ओरिसाला नेण्यात आले. ओरिसा येथील अंगुल येथून 60 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे. येत्या तीन दिवसात ऑक्सिजन घेऊन नागपुरात हे टँकर परतील.

नागपुरात कोरोनाचा मोठा उद्रेक आहे. ऑक्सिजन तुडवड्यामुळे मोठी गंभीर स्थिती निर्माण झाली होती. मात्र ऑक्सिजन पुरवठ्याच्या दृष्टीने होत असलेले प्रयत्नामुळे  आता परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रयत्न केल्यानंतरल हवाई दलाच्या मदतीने ऑक्सिजन टँकर ओरिसला पाठवण्यात आले.

 महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य हज समितीच्या अखत्यारित असलेल्या नागपूर येथील हज हाऊसच्या इमारतीमध्ये कोविड सेंटर सुरु करण्यात येत असल्याची माहिती अल्पसंख्याक  मंत्री नवाब मलिक यांनी दिली. दरम्यान यासाठी नागपूर हज हाऊसचा ताबा तेथील जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यासंदर्भात सूचना निर्गमित करण्यात आल्या असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.