अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर : रोषणाईचा पर्व समजल्या जाणाऱ्या दिवाळीच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज आपल्या रहात्या घरी समाजातील विविध वर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लहान मुलांसोबत दिवाळी साजरी केली. अनाथ आणि विविध जाती-पंथातील सुमारे दीडशे लहान मुलांसोबत दिवाळी साजरा करण्याचा हा उपक्रम संघ परिवारातील भारत विकास परिषद या संस्थेने आयोजित केला होता
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरातील या लहानग्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघितला की दिवाळीची ही भेट त्यांच्याकरता किती महत्वाची आहे हे सहजच कळेल. संघ परिवारातील भारत विकास परिषद नावाच्या संस्थेने हा आगळा-वेगळा उपक्रम राबवला.
या अंतरंगात शहरातील विविध झोपडपट्टी आणि अनाथालयातून १४२ मुलांना एका मोठ्या मॉल मध्ये नेले. तेथे या मुलांनी मनसोक्त खरेदी केली. आयुष्यात कधीही मॉलची पायरीहि न चढलेल्या या मुलांकरता मॉल मधील खरेदीचा हा क्षण अविस्मरणीय होता. आजच्या या सोहळ्यात सहभागी झालेल्या एकूण १४२ चिमुकल्यांपैकी ५६ मुले नागपुरातील अनाथालयातील होती.
या लहान मुलांकरता आजची हि दिवाळीची हि भेट अतिशय महत्वाची होती. भारत विकास परिषदे प्रमाणे इतर संस्थांनी देखील प्रेरणा घेत अश्याच प्रकारे दिवाळी साजरी केली तर खऱ्या अर्थाने समाजातील दुर्लक्षित वर्गांच्या आयुष्यात प्रकाश पडेल.