पळपुट्या नीरव मोदीचा अलिबागचा बंगला स्फोटानं उद्ध्वस्त

नीरव मोदी फरार झाल्‍यानंतर हा ३० हजार चौरस फुटांचा बंगला सक्‍तवसुली संचालनालयाने ताब्‍यात घेतला होता

Updated: Mar 8, 2019, 01:49 PM IST
पळपुट्या नीरव मोदीचा अलिबागचा बंगला स्फोटानं उद्ध्वस्त  title=

अलिबाग : पंजाब नॅशनल बँकेला करोडो रूपयांचा गंडा घालून फरार झालेला डायमंड किंग नीरव मोदी याचा रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील किहीम समुद्र किनाऱ्याजवळील बंगला आज नियंत्रित स्‍फोटाने जमीनदोस्‍त करण्यात आला. बंगल्‍याच्‍या इमारतीला सुरूंग लावून स्फोट (कंट्रोल ब्लास्ट) करण्यात आलाय. नीरव मोदी फरार झाल्‍यानंतर हा ३० हजार चौरस फुटांचा बंगला सक्‍तवसुली संचालनालयाने ताब्‍यात घेतला होता.  दरम्‍यान हा बंगला जिल्‍हाधिकारी यांनी अनधिकृत ठरवल्‍यानंतर त्‍यावर कारवाई करण्‍यासाठी तो रायगड जिल्‍हा प्रशासनाच्‍या ताब्‍यात देण्‍यात आला होता. 

नीरव मोदीचा बंगला पाडण्यासाठी प्रशासनानं ८ मार्च ही तारीख ठरवली होती. याबद्दल रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी माहिती दिली. स्पेशन टेक्निकल टीम गेल्या दोन दिवसांपासून बंगला पाडण्यासाठी पिलरदरम्यान स्फोटकं लावण्याचं काम करत होती. 

यापूर्वी नीरव मोदीचा बंगला पाडण्याचं काम जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात स्थगित करण्यात आलं होतं. हा बंगला इतका मजबूत होता की तो पाडण्यासाठी जेसीबी आणि पोकलेन मशीनही असमर्थ ठरल्या होत्या. 

दरम्यान, बंगला पाडण्यासाठी पोहचलेल्या टीमला इथं किंमती सामानही सापडलंय. ते सुरक्षित बाहेर काढून जप्त करण्यात आलंय. आता या सामानाचाही लिलाव केला जाईल. यामध्ये झुंबर आणि बाथरुममध्ये लावण्यात आलेले शॉवर यांचाही समावेश आहे. नीरव मोदीचा हा बंगला जवळपास २०,००० स्केअर फूट परिसरात पसरलेला होता.

रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी अलिबागच्या किहिम स्थित ५८ अवैध इमारती पाडण्याचे आदेश दिले होते. त्यावर, ही कारवाई सुरू न करण्यावर मुंबई हायकोर्टानं प्रशासनाला फटकारल्यानंतर या इमारती पाडण्याच्या आदेशांवर कारवाई सुरू झालीय.