धक्कादायक, नवजात बाळाची तस्करी, नवी मुंबईत टोळीचा पर्दाफाश

धक्कादायक बाब म्हणजे एक डॉक्टरच या टोळीचा म्होरक्या असल्याचं समोर आलं आहे

Updated: Nov 3, 2021, 09:00 PM IST
धक्कादायक, नवजात बाळाची तस्करी, नवी मुंबईत टोळीचा पर्दाफाश title=

स्वाती नाईक झी मीडिया, नवी मुंबई : नवी मुंबईत नवजात बाळांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे एक डॉक्टरच या टोळीचा म्होरक्या असल्याचं समोर आलं आहे. कामोठेतील डॉक्टर या बाळांची तस्करी करत होता. पंकज पाटील असं या डॉक्टरचं नाव आहे. कामोठे सेक्टर-8मध्ये फॅमिली हेल्थ केअर नावानं त्याचा दवाखाना आहे. 

हा डॉक्टर नवजात बाळांची विक्री करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी बनावट खरेदीदार पाठवून पंकज पाटीलला बेड्या ठोकल्य़ा आहेत. अटक करण्यात आलेल्यामध्ये बाळाची आई अमरिन बानो बदरबखश अली (31), बाळ विक्री करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या रुखसार नदिन शेख (29) आणि रजनि जाधव (32) तसंच बाळाची विक्री करण्यासाठी मध्यस्थी करणारा डॉक्टर पंकज पाटील या चौघांचा समावेश आहे. 

असा रचला सापळा

कामोठे इथल्या रुग्णालयात लहान मुलाची विक्री होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांनी मिळाली होती. यानंतर पोलिसांनी साध्या वेशातील एका पोलिसाला हॉस्पीटलमध्ये पाठवला. या पोलिसाने डॉक्टरची भेट मुल विकत घ्यायचं असल्याचं सांगितलं तसंच डॉक्टरला चार लाखांची रक्कम दिली. डॉ. पंकज पाटील याने फोन करुन अमरिन बानो, रुखसार शेख आणि रजनी जाधव यांना बोलावून घेतलं. त्यांनी अडीच महिन्याच्या बाळाला खरेदीदाराच्या ताब्यात दिलं.

या व्यवहारानंतर तिनही महिला तिथून निघून जात असतानाच पोलिसांनी छापा मारून डॉक्टरसहीत सर्वांची धरपकड केली. याप्रकरणी पोलिसांनी डॉक्टरसह तिनही महिलांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.