Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एकदा नव्या जोमाने उभा राहील अशा शब्दांत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी ठणकावून सांगितलं आहे. अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार साताऱ्यात (Satara) पोहोचले असून महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. शरद पवारांनी साताऱ्यात दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं. यानंतर त्यांनी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत पुन्हा एकदा आपली भूमिका मांडली.
मी आज केलेली सुरुवात ही पुढील दिशा आणि निकाल ठरवण्यासाठी आहे. आज मी दौऱ्यावर आलो असता लोकांनी तुफान गर्दी केली होती. यामधील 70 ते 80 टक्के तरुण आहेत. हे सर्व तरुण पाठिंबा देत असल्याचं चित्र आहे असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, आमदारांच्या अपात्रतेसंबंधीचा निर्णय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील घेतील असं शरद पवारांनी स्पष्ट केलं. दरम्यान, बंडखोर आमदारांनी भेट देण्यास वेळ मागितली तर विचार करु असं त्यांनी स्पष्ट केलं.
मला अजिबात दु:ख वाटत नाही. असे निर्णय घेतल्यानंतर काही महिने, वर्षांनी निवडणुकीत राज्यातील मतदार त्याचा निर्णय देतो. माझा त्यांच्यावर विश्वास आहे असं शरद पवारांनी सांगितलं. पंतप्रधानांनी जाहीरपणे आमच्या पक्षात असे लोक असून त्यांना जागा दाखवू असं म्हटलं होतं. पण मंत्रिमंडळात जागा दिली आहे हे पाहता त्यांनी कोणती शहानिशा न करता हे वक्तव्य केलं होतं असं दिसत आहे असं सांगत शरद पवारांनी ईडीच्या कारवाईला घाबरुन आमदार गेल्याचा दावा फेटाळून लावला.
"आज देशात भाजपाच्या माध्यमातून समाजात, जातींमध्ये धर्माधर्मात एक प्रकारचं वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. या सर्वांशी संघर्ष करुन सामाजिक ऐक्य आणि समता यासाठी प्रयत्न करणं याची सहकाऱ्यांकडून अपेक्षा आहे. काहीजणांनी वेगळी भूमिका घेतली. त्यांनी महाराष्ट्रात कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याने अनेक वर्षं मोलाची कामगिरी केली. पण तेच लोक ज्या प्रवृत्तीशी आमचा संघर्ष आहे त्यांच्यासह गेल्याने नव्या पिढीचा कार्यकर्ता नामशेष होऊ नये, तो नव्या जोमाने उभा राहावा यासाठी हा दौरा सुरु केला आहे," असं शरद पवार यांनी सांगितलं.
"जिल्ह्यात आल्यानंतर सकाळी 8 वाजता गाडीत बसल्यापसून ठिकठिकाणी फार मोठ्या संख्येने कार्यकर्ते गर्दी करुन उभे होते. यामध्ये 70 ते 80 टक्के तरुण स्वागताला आणि पाठिंबा द्यायला उभे आहेत हे चित्र पाहिलं. आम्ही लोकांनी कष्ट केले. सर्व चळवळींना योग्य दिशा, कार्यक्रम दिला तर दोन ते तीन महिन्यात संपूर्ण महाराष्ट्राचं राष्ट्रवादीला अनुकूल असेल. त्याची सुरुवात साताऱ्यात झाली याचा आनंद आहे. आजचा दिवसा गुरुपौर्णिमेचा आहे. म्हणून मी यशवंतराव चव्हाणांच्या समाधीला नमन करु सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील तरुण पुन्हा एकदा राष्ट्रवादी मजबूत करण्यास उभा राहील," असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे.
"अनेकांनी फोन केले आहेत. अनेकांची इच्छा पक्षाच्या मूळ धोरणापेक्षा वेगळी भूमिका घेऊ नये अशी आहे. ते योग्य वेळी निर्णय जाहीर करतील. अजित पवार काही परके नाहीत. माझी मुलगीच तीन वेळा तिथे गेली होती. म्हणजे काही चूक केलं नाही. मतभिन्नता काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न एखाद्या सहकाऱ्याने केला तर लगेच संशय व्यक्त केला जाऊ नये," असं सांगत शरद पवारांनी अमोल कोल्हेंची पाठराखण केली.
"आम्ही कोणावर अपात्रतेची कारवाई करणार नाही. कोणी क्षुद्ध बुद्धीची व्यक्ती असेल तर ती त्याला आशीर्वाद म्हणेल. मी जाहीरपणे पक्षाच्या बांधणीसाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालो असताना आशीर्वाद म्हणत दर्जा खराब करु नका," असं शरद पवारांनी खडसावून सांगितलं.
"महाराष्ट्राच्या विधानसभेत जयंत पाटील यांच्याकडे नेतृत्व दिलं असून ते विधीमंडळ नेते आहेत. अपात्रतेसाठी त्यांनी पत्रव्यवहार केला असेल तर हा त्यांचा अधिकार आहे. मला याबद्दल माहिती नाही. पण त्यांनी निर्णय गेतला असेल तर विचारपूर्वक घेतला असेल," असं शरद पवारांनी सांगितलं.
अजित पवारांच्या विधानावर बोलताना ते म्हणाले की, "आम्ही शिवसेनेसह अडीच वर्षं काम केलं, त्यावेळी काही अडचण आली नाही. देशात आणीबाणी जाहीर झाली तेव्हा अनेक पक्षांनी, माध्यमांनी इंदिरा गांधींवर हल्ले केले होते. त्यावेळी इंदिरा गांधींची भूमिका योग्य म्हणणारी एकच व्यक्ती होती, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि पक्ष शिवसेना. त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांनी एकही उमेदवार न देता त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे आम्ही यावेळी काही वेगळं केलं होतं असं नाही. अडीच वर्षांपूर्वी सरकार स्थापन झालं तेव्हा शिवसेनेची चिंता वाटली नाही का?".