बारसूमधील रिफायनरीवरुन आंदोलक पेटले असतानाच शरद पवारांनी शिंदे सरकारला दिला सल्ला, म्हणाले...

Sharad Pawar on Barsu Refinery: कोकणातील राजापूरमधील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीवरून (Barsu Refinery) वाद पेटला असताना शरद पवारांनी (Sharad Pawar) राज्य सरकारला स्थानिकांशी चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 26, 2023, 12:36 PM IST
बारसूमधील रिफायनरीवरुन आंदोलक पेटले असतानाच शरद पवारांनी शिंदे सरकारला दिला सल्ला, म्हणाले... title=

Sharad Pawar on Barsu Refinery: कोकणातील राजापूरमधील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीवरून (Barsu Refinery) वाद पेटला आहे. प्रकल्पाच्या माती परीक्षणाला स्थानिकांनी विरोध केला असून, पोलीस बळाचा वापर करण्यात आल्याने विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी जवळपास 110 आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्याशी चर्चा केली आहे. यावेळी त्यांनी स्थानिकांशी चर्चा करण्याचा सल्ला राज्य सरकारला दिला आहे. 

"उदय सामंत यांच्यासोबत चर्चा करुन आढावा घेतला. यावेळी पोलीस बळाचा वापर झाल्यासंबंधीही बोलणं झालं. त्यावर त्यांनी आम्ही आता कारवाई करणार नसल्याचं म्हटलं आहे. सध्या फक्त जमिनीची तपासणी करत असून त्यासाठी लोक विरोध करत होते. पण आता त्यांचा विरोध नाही. लोकांना समजावून सांगितलं आहे अशी माहिती त्यांनी दिली," असं शरद पवार यांनी सांगितलं. 

"आम्हाला हा प्रकल्प करायचा असल्याची सरकारची भूमिका आहे. पण आम्ही त्यांना घाई करु नका असं सांगितलं आहे. तेथील स्थानिक विरोधक आणि शासकीय अधिकारी यांची बैठक घ्या आणि त्यातून काय निष्पन्न होतं हे पाहूया असं म्हटलं. त्यावर सामंत यांनी उद्याच आंदोलकांचे प्रतिनिधी आणि राज्य शासनाचे प्रतिनिधी बैठक घेतील. त्यातून येणारा निष्कर्ष सरकारला दिला जाईल. त्यानंतर जर आणखी काही प्रश्न असतील तर त्यावर चर्चा करत मार्ग काढू किंवा  काही पर्याय आहे का त्यावर बोलू असा सल्ला मी दिला," असं शरद पवार यांनी सांगितलं आहे. 

शरद पवारांनी प्रकल्पावर त्यांची भूमिका काय असं विचारलं असता ते म्हणाले, "मी स्थानिकांशी चर्चा केलेली नाही. कोणताही प्रकल्प करताना स्थानिकांना विश्वासात घेणं गरजेचं असतं. त्यांचा विरोध असेल तर ते समजून घेत त्यातून मार्ग काढणं गरजेचं आहे. कोकणात काही नवीन होत असेल आणि स्थानिकांच्या तीव्र भावना असतील तर कोणत्याही सरकारने त्याची नोंद घेतली पाहिजे'. दरम्यान माझ्या पक्षाचे काही सहकारी तिथे जाणार आहेत अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. 

जर उद्या होणाऱ्या बैठकीतही काही तोडगा निघाला नाही, तर आपण सर्वांना एकत्र बसून चर्चा करु आणि त्यातून काही मार्ग काढता येतो का हे पाहू अशी सूचना मी उद्योगमंत्र्यांना केली असून, ती त्यांनी मान्य केली आहे असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं. उद्योगमंत्र्यांनी आम्ही कोणाचीही जमीन ताब्यात घेतलेली नसून, माती परीक्षण सुरु होतं, तेदेखील थांबवलं आहे अशी माहिती दिल्याचं शरद पवारांनी सांगितलं. 

शरद पवार यांनी यावेळी अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुट्टीवर गेल्याच्या प्रश्नावर भाष्य करण्यास नकार दिला.