औरंगाबाद : औरंगाबादच्या कन्नड मतदार संघात, संतोष कोल्हे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभा घेतली. यावेळी पवारांनी केंद्र आणि राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे. सध्याचे राज्यकर्ते लष्कराच्या शौर्याचेही श्रेय घेतात. इंदिरा गांधींच्या काळात अनेक कामं झाली, मात्र त्यांनी असं श्रेय कधी घेतलं नाही अशी टीका शरद पवारांनी केली.
राज्यात अनेक प्रश्न आहेत आणि यांचं फक्त ३७० सुरू आहे, रात्री झोपेतही हे ३७० करत असतील, असा उपरोधिक टोलाही पवारांनी लगावला. ३७० हा प्रश्न नाहीच, प्रश्न शेतीमालाच्या भावाचा असल्याचंही ते म्हणाले.
अनुच्छेद ३७० काढून आम्ही चमत्कार केला असं राज्यकर्ते सांगतात, ३७० हटवले आता ३७१ चं काय? ते हटवून बाकी राज्यातही का अधिकार देत नाही? असेही पवार म्हणाले.
नागालॅंड, मेघालय, अरूणाचल, सिक्कीम या ईशान्येकडील राज्यांमध्ये जमीन घ्यायचा अधिकार आपल्याला नाही, त्याचं काय.. खरंतर देशात कलम ३७० किंवा ३७१ यापेक्षा माझ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव कसा मिळेल, कपाशीला भाव कसा मिळेल हा खरा प्रश्न आहे. pic.twitter.com/oVcVq6ztCk
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 14, 2019
भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा काश्मिरची भाषा, संस्कृती वेगळी असल्याने त्यांच्या अधिकाराला संरक्षण देण्यासाठी घटनेत ३७० चे कलम आणण्यात आले. आता कलम ३७० हटवल्याने आपण तिथली जमीन खरेदी करू शकतो, हाच बदल झाला आहे. मात्र याचा गाजावाजा आजचे राज्यकर्ते मोठ्या प्रमाणावर करत आहेत. pic.twitter.com/HzWV8Mik7k
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 14, 2019
आम्ही पंतप्रधान पदाचा आदर करतो, पण त्या पदावर असणाऱ्या माणसानेही याची जाणीव ठेवावी असं पवार म्हणाले. तुम्ही कितीही दडपशाही केली तरी आमचे विचार संपणार नाही, १५० वर्ष राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना काँग्रेसने बाहेर केलं, काँग्रेस त्यांना घाबरला नाही तर यांना काय घाबरणार असा टोलाही त्यांनी लगावला.
मी पंतप्रधानांना नम्रपणे सांगू इच्छितो की, पंतप्रधान हे पद देशाच्या इभ्रतीचं पद आहे. आम्ही त्याचा सन्मान करतो. आम्ही पंतप्रधान पदाची बेइज्जत कधी होऊ देणार नाही. परंतु पंतप्रधान पदावर बसलेल्या माणसाने सुद्धा त्या पदाची प्रतिष्ठा राहील अशी पावले टाकली पाहिजेत. pic.twitter.com/TcgQFaiiQb
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 14, 2019
पाच वर्षांपूर्वी अमित शाह माहीत होते का कुणाला? ते लोकशाहीत निवडून आले. मात्र निवडून आल्यानंतर समाजासाठी काम करणं गरजेचं आहे. पण हे राज्यकर्ते सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे.