मुंबई: मराठा आरक्षणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बदलत्या भूमिकाबाबत राजकीय वर्तुळातून शंका व्यक्त केली जातेय... मध्यंतरी राज ठाकरे यांना दिलेल्या मुलाखतीत आर्थिक निकषावर आरक्षण हवे, अशी भूमिका पवारांनी मांडली होती. तर परवा कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत एससी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं, असं मत त्यांनी मांडलं.
मराठा आरक्षणाचं आंदोलन थांबावायला हवं, असं आवाहन माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणेंनी केलंय. झी २४ तासला दिलेल्या खास मुलाखतीत नारायण राणेंनी मराठा आरक्षणासाठी सध्या सुरू असलेल्या हिंसक आंदोलनामागे राजकीय पक्ष असल्याचा आरोपही केलाय. पवारांनी चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलंय. त्यांनी महाराष्ट्राच्या प्रतीमेला काळीमा लागेल अशा घटना रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा असंही राणेंनी म्हटलंय. शिवाय मराठा आरक्षणासाठी घटना दुरुस्तीची गरज नसल्याचंही त्याचं म्हणणं आहे.
दरम्यान, समाजातील जातीपातींचा अंत होणे शक्य नाही, असे वक्तव्य शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केले. सध्या राज्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी 'झी २४ तास'शी संवाद साधला. मराठा आरक्षणासाठी घटनादुरुस्ती आवश्यक आहे, असे मत शरद पवारांसह अनेक नेत्यांनी मांडले होते. मात्र, घटनादुरुस्ती ही काही सोपी बाब नाही. शरद पवारांनी शक्य असूनही मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, असा आरोपही मेटेंनी केला. परंतु, तुर्तास मराठा समाजाला शांत करण्याची गरज आहे. मराठा तरुणांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.