'गाजराचा पाऊसही पडू शकतो', पेट्रोल-डिझेल स्वस्त झाल्यानंतर सुप्रिया सुळेंचा टोला

आता लोकसभा निवडणूक असल्याने काहाही होऊ शकतं असा टोल सुप्रिया सुळेंनी लगावला आहे. ज्याप्रकारे केंद्र सरकार ईडी, सीबीआय, आयकर यांचा वापर करत आहे ते दुर्देवी आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.    

शिवराज यादव | Updated: Mar 15, 2024, 12:11 PM IST
'गाजराचा पाऊसही पडू शकतो', पेट्रोल-डिझेल स्वस्त झाल्यानंतर सुप्रिया सुळेंचा टोला title=

लोकसभा निवडणूक असल्याने काहाही होऊ शकतं असा टोल सुप्रिया सुळेंनी लगावला आहे. पाच वर्षांपूर्वी ईडी म्हणजे काय हे लोकांना माहिती नव्हतं.  पण आता ज्याप्रकारे केंद्र सरकार ईडी, सीबीआय, आयकर यांचा वापर करत आहे ते दुर्देवी आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. तसंच सध्या लोकसभा निवडणूक असल्याने गाजराचा पाऊसही पडू शकतो असा टोला त्यांनी लगावला आहे. त्या पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 

पेट्रोल, डिझेल स्वस्त झाल्यासंबंधी विचारण्यात आलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "निवडणुकीच्या 15 दिवस आधी पेट्रोल, डिझेल, गॅस, सिलेंडर स्वस्त होतो याचं आश्चर्य वाटतं. संसदेत मी फार मन लावून, कान देऊन भाषण ऐकत असते. दरवाढ होते तेव्हा कंपन्यांनी केली असून, सरकारने केली नसल्याचं सांगितलं जातं. पण जेव्हा दर कमी होतात तेव्हा सरकार त्याचं श्रेय घेतं. असं कसं चालेल. दर वाढले आणि कमी झाले तरी त्यासाठी कंपन्याच जबाबदार असल्या पाहिजेत," असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. 

सध्या लोकसभा निवडणुका असल्याने गाजराचा पाऊसही पडू शकतो असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. "पाच वर्षांपूर्वी राज्यातील लोकांना ईडी म्हणजे काय हेदेखील माहिती नव्हतं. पण सध्या ज्याप्रकारे केंद्र सरकार ईडी, सीबीआय, आयकर यांचा वापर करत आहे ते दुर्देवी आहे. या तिन्ही स्वायत्त संस्था होत्या. अदृश्य शक्ती सीबीआय, ईडीचा वापर करत पक्ष, घरं फोडत असून लोकांना भीती दाखवत आहे. आज दडपशाही वाढत चालली आहे. लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम सुरु असून, अदृश्य शक्ती हे पाप करत आहे," अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. 

पेट्रोल-डिझेल स्वस्त

लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा कधीही होऊ शकते. पण त्याआधी सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असून इंधन कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलच्या दरांत प्रत्येकी दोन रुपयांची कपात केली. शुक्रवारी सकाळपासून ही दरकपात लागू झाली आहे. या दरकपातीमुळे मुंबईत पेट्रोलचा दर 104.21 रुपये तर डिझेलचा दर 90.15 रुपये प्रतिलिटर झाला आहे.