पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि बारामतीच्या लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल शेवाळे यांची ऑडीओ क्लीप व्हायरल झाली आहे. राहुल शेवाळे यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला आहे. त्यांनंतर सुप्रिया सुळेंनी फोनवरून धमकावल्याचे कथित ऑडीओ क्लीपमधून समोर आले आहे. पण सुप्रिया सुळेंनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. माझ्याविरोधात हे षडयंत्र असल्याचे सांगत मी राहुल शेवाळेंच्या विरोधात डीफिमेशन केस दाखल करणार असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मतदान तीन दिवसांवर आले असताना अशा पद्धतीने माझ्यावर आरोप केला जात असल्याचे सुळे म्हणाल्या. आमच्या पक्षातून अनेक जण भाजपमध्ये गेलेत ते काही एकटेच नाहीत असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. एक महिला आहे म्हणून अशा पद्धतीने घाण राजकरण केले जात आहे. मी जर धमकी दिली असेल तर त्यांनी माध्यमांकडे जाण्याची गरज नव्हती असे सांगत शेवाळे पोलीस स्टेशनला का गेले नाहीत ? असा प्रश्न सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला.
सुप्रिया सुळे : राहुल, मी तुम्हाला कधी अपमानित केलं हो?
राहुल शेवाळे : हॅलो
सुप्रिया सुळे : राहुल, सुप्रिया सुळे बोलतेय, तुम्हाला कधी अपमानित केलं हो? राहुल शेवाळे : हां ताई.
राहुल शेवाळे : नाही.
सुप्रिया सुळे : तुमचं स्टेटमेंट आहे, की पवार, सुळेंनी अपमानित केलं म्हणून...
राहुल शेवाळे : हां.. नाही नाही...
सुप्रिया सुळे : तुम्हाला कधी अपमानित केलं मी?
राहुल शेवाळे : दोन पेपरला चुकीची स्टेटमेंट आली आहेत. एक सकाळला आलंय.. एक मटाला आलंय. मटाला तुमचं आणि दादाचं नाव आलंय.
सुप्रिया सुळे : एक मिनिट होल्ड करा.... हा हा, नाय तुमच्या नावानं स्टेटमेंट आहे. विजय कोळसेंचं नाव कसं तुम्ही आणताय मध्ये?
राहुल शेवाळे : नाय, नाय तसं नाय, म्हनलं तुम्हाला मी
सुप्रिया सुळे : तुम्ही भाजपमध्ये गेलाय. एक लक्षात ठेवा. राहुळ शेवाळे सुप्रिया सुळेच्या नादी लागू नका. मी कॉन्ट्रक्टर नाही, घरात येऊन ठोकून काढीन. मी गंभीर आहे. माझी बदनामी केली ना, तर अब्रुनुकसानीचा दावा करीन. माझ्यासारखी वाईट बाई नाही. माझ्यासारखी खरी बाई नाहीय. लक्षात ठेवा रेकॉर्ड केलं तरी चालेल.
राहुल शेवाळे : मी स्टेटमेंट केलेलं नाही, चुकीचं स्टेटमेंट त्यांनी छापलं आहे.
सुप्रिया सुळे : एक लक्षात ठेवा. माझ्या नादी लागू नका. मी तुमच्याशी आतापर्यंत गोड वागलेय. आय एम अ व्हेरी ऑनेस्ट लेडी, माझी बदनामी केली तर काय येऊन करायचं, ते मी करीन.