ठाणे : भाजपचे ठाणे महापालिकेचे नगरसेवक विलास कांबळे यांचा डान्सबारमध्ये धुंदीतील डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे लोकसभेच्या ऐन निवडणुकीत तो व्हायरल झाल्याने भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत. या व्हिडिओमुळे निवडणुकीवर यांचा परिणाम होण्याची चर्चा सुरु झालेय. कांबळे यांच्याबाबत पक्ष काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरु असून उमेदवार दिवस रात्र प्रचाराच्या कामाला लागले आहेत. युतीच्यावतीने विद्यमान खासदार राजन विचारे हे युतीचे उमेदवार असून त्यांच्या प्रचारासाठी शिवसेना आणि भाजपचे नगरसेवकांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे. वादाच्या भोवऱ्यात असणारे भाजपचे नगरसेवक आता नव्या वादात सापडले आहेत. युतीच्या उमेदवाराचा प्रचार सोडून विलास कांबळे धुंद अवस्थेत डान्सबारमध्ये डान्स करण्यात मग्न असून त्यांचा डान्सबारमधील डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
विलास कांबळे हे बनावट नंबरप्लेटमुळे देखील त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. बारमध्ये तोडफोड करण्याचा प्रकार देखील त्यांनी केला होता. बसपामधून विलास कांबळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. विलास कांबळे आणि त्यांची पत्नी दोघेही ठाणे महापालिकेत नगरसेवक आहेत. स्थायी समिती सदस्यपद देखील त्यांनी यापूर्वी भूषविले आहे. ऐन निवडणुकीत हा व्हिडिओ व्हायरल पक्षाची डोकेदुखी वाढली आहे.