Ajit Pawar Shown Black Flags: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचके यांच्यासह कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी सुरू केली. पर्यटन तालुका असताना शासकीय कार्यक्रम घेऊन घटकपक्षांना डावललं जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच अजित पवारांनी पालकत्वाची भूमिका पाळली नाही याबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. मात्र महायुतीत असतानाही भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी जाहीर केली आहे.
अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत आज सकाळीच नारायणगाव येथील निलायम गार्डन मंगल कार्यालयात विविध बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. अजित पवारांचा ताफा या ठिकाणी पोहोचला असता भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आशा बुचके यांच्यासह कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. अजित पवारांचा ताफा ज्या ठिकाणावरुन बैठकींचं आयोजन करण्यात आलेल्या सभागृहात जात होता त्याच मार्गावर हे आंदोलन करण्यात आलं.
अमोल मिटकरी यांनी या घटनेवर संताप व्यक्त करताना देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ खुलासा करण्याची मागणी केली आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली असून त्यात लिहिलं आहे की, "जनसन्मान यात्रा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वतंत्र कार्यक्रम आहे. काळे झेंडे दाखवणाऱ्यांनी स्वतंत्र कार्यक्रम घ्यावा आणि आज जे काळे झेंडे दाखवले गेले त्याबाबत देवेंद्रजीनी तात्काळ खुलासा करावा".
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही याप्रकरणी नाराजी जाहीर करत महायुतीला गालबोट लागत असेल तर वरिष्ठ पातळीवर ताकीद मिळाली पाहिजे अशी भूमिका मांडली आहे. निदर्शन करण्याची काही गरज नव्हती असंही ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.
"हा पक्षाचा कार्यक्रम आहे. माझ्या जिल्ह्यात अनेकदा भाजपाचे नेते, मंत्री येतात. आम्ही कधी त्यावर आक्षेप घेत नाही. त्यामुळे जर कोणी महायुतीला गालबोट लावत असेल तर वरिष्ठ पातळीवर ताकीद मिळाली पाहिजे अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. जनसन्मान यात्रा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काढली आहे. त्यामुळे गैरसमजातून घटकपक्षाने अशा प्रकारचे काही करु नये असं प्रदेशाध्यक्ष म्हणून मला वाटत आहे," असं सुनील तटकरे म्हणाले आहेत.
"बुचकेंनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवणे ही निव्वळ एक स्टंटबाजी होती," असं म्हणत अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरांनी बुचकेंची खिल्ली उडवली. "काळे झेंडे दाखवण्यापेक्षा थेट अजितदादांना भेटल्या असत्या तर प्रश्न मार्गी लागायला मदत झाली असती. पण केवळ बातम्या व्हाव्यात म्हणून बुचकेंनी ही स्टंटबाजी केली," असा पलटवार चाकणकरांनी घडलेल्या प्रकाराबद्दल बोलताना केला आहे.