'दंगली घडवण्यासाठीच राम नवमी आणि हनुमान जयंती,' विधानावरुन वाद, आव्हाडांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले...

Jitendra Awhad Clarification: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दंगलींचा उल्लेख करत केलेल्या विधानानंतर झालेल्या वादावर स्पष्टीकरण दिलं आहे.     

शिवराज यादव | Updated: Apr 22, 2023, 06:01 PM IST
'दंगली घडवण्यासाठीच राम नवमी आणि हनुमान जयंती,' विधानावरुन वाद, आव्हाडांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले... title=

Jitendra Awhad Clarification: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दंगलींचा उल्लेख करत केलेल्या एका विधानावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. दंगली घडवण्यासाठीच राम नवमी (Ram Navmi) आणि हनुमान जयंती (Hanuman Jayanti) साजरी केली जाते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असं जितेंद्र आव्हाड म्हणाले होते. हे विधान करताना त्यांनी औरंगाबाद येथील दंगलीचा हवाला दिला होता. दरम्यान या विधानावरुन वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण देत आपण योग्यच बोलल्याचं म्हटलं आहे. 

"समाजात तेढ निर्माण होऊ नये म्हणून आमच्यासारखे लोक गेल्या 40 वर्षांपासून काम करत आहेत. मी माझ्या डोळ्यांसमोर अनेक दंगली पाहिल्या आहेत. अनेक दंगली शमवल्याही आहेत. मी समाजाला जोडणारा माणूस आहे. मी कोणतंही विधान अत्यंत विचारपूर्वक आणि गांभीर्याने करतो. त्यामुळे मी जे बोललो आहे ते योग्य आहे," असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. 

जितेंद्र आव्हाड यांच्या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही टीका केली आहे. हा राम भक्तांचा अपमान आहे. दंगली होतील म्हणजे तुम्ही ठरवले आहे का? दंगली होतील अशी विचारणा फडणवीसांनी केली आहे.  अशा बाबती आपण संवेदनशील असले पाहिजे, सनसनाटी निर्माण होईल अशी विधानं करू नये असाही सल्ला त्यांनी दिला. दरम्यान आव्हाडांनी फडणवीसांच्या या टीकेलाही उत्तर दिलं आहे. 

"देशात जे घडत आहे ते सनसनाटीच आहे. खारघरमध्ये जे झालं ते सनसनाटी नव्हतं का? इतका निष्काळजीपणा, असंवेदनशीलता सरकार कसं काय दाखवू शकतं? त्यावर बोलायचं नाही का? जे मेले ते हिंदू नव्हते का? कायम हिंदू-मुस्लिम करणारं सरकार यावर काहीच बोलत नाही. मग त्यांनी काय हिंदूंना मारण्याची सुपारी घेतली होती का? हे बोललं की सरकारला राग येतो. अपघात कुठेही होऊ शकतात. पण तिथे झाला की अपघात आणि येथे झालं की मुद्दामून असं होत नाही," असं प्रत्युत्तर जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे. 

"भाजपाच्या लोकांना तक्रार करायच्या असतील तर करु द्या. मी करु नका असं कुठे म्हटलं आहे. मी माझं विधान मागे घेतो असं कुठे म्हटलं आहे. मी लहानपणी हनुमानाचं गाणं ऐकायचो तेव्हा तो प्रेमळ, भक्तीने प्रेरित झालेला, छातीत राम दाखवणारा, प्रेमाचा रक्षक असा दिसायचा. पण आता गदा हातात घेऊन मारणार असं काही चित्र नव्हतं. मर्यादा माहिती असलेला राम आम्हाला शिकवला होता. पण आता भगवा आला तर लोक धावत सुटतात. यांनी भीती निर्माण केली आहे," अशी टीका आव्हाडांनी केली आहे. 

दिवाळीची शोभायात्रा, पाडव्याची शोभायात्रा यावेळी कधीच दंगली होत नाहीत. पण काही ठराविक सणांनाच दंगली होतात असा आरोप आव्हाडांनी यावेळी केला.