'तर 4 महिन्यांनी मीच नमस्कार करेन,' जयंत पाटील यांनी शरद पवारांसमोरच केलं जाहीर, 'माझ्याबद्दल तक्रार असल्यास....'

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आपण केवळ 4 महिनेच प्रदेशाध्यक्ष राहणार असल्याचं जाहीर केलं आहे. शरद पवारांसमोर (Sharad Pawar) त्यांनी आपल्याबद्दल काही तक्रार असल्यास साहेबांना सांगा असंही म्हटलं. यानंतर त्यांचा रोख नेमका कोणाकडे होता? याची चर्चा रंगली आहे.   

शिवराज यादव | Updated: Jun 11, 2024, 02:06 PM IST
'तर 4 महिन्यांनी मीच नमस्कार करेन,' जयंत पाटील यांनी शरद पवारांसमोरच केलं जाहीर, 'माझ्याबद्दल तक्रार असल्यास....' title=

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आपण केवळ 4 महिनेच प्रदेशाध्यक्ष राहणार असल्याचं जाहीर केलं आहे. शरद पवारांसमोर (Sharad Pawar) त्यांनी आपल्याबद्दल काही तक्रार असल्यास साहेबांना सांगा असंही म्हटलं. माझे महिने अनेकांनी मोजले आहेत. माझ्याबद्दल काही तक्रार असेल तर शरद पवारांना सांगा. मात्र जाहीर बोलू नका असं आवाहन त्यांनी केलं आहे. यानंतर त्यांचा रोख नेमका कोणाकडे होता? याची चर्चा रंगली आहे. रोहित पवारांनी याआधी ट्विट करुन नाराजी जाहीर केली होती. त्यामुळे त्यांचा रोख त्यांच्याकडे तर नाही ना असा प्रश्न निर्माण होत आहे. 

"मी पक्षाचा अध्यक्ष आहे. माझे महिने अनेकांनी मोजून झाले आहेत. आता माझे महिने पुढील 4 महिने मोजू नका. मी काहीतर व्यवस्था करतो. पक्ष महाराष्ट्राच्या लाखो लोकांची संपत्ती आहे, कोणा एकाची संपत्ती नाही. मी चुकीचा वागलो तर महाराष्ट्रातील जनतेवर परिणाम होणार आहे याचं भान ठेवून वागूयात. नोव्हेंबरनंतर मीच नमस्कार करेन," असं जयंत पाटलांनी पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यात जाहीर केलं आहे. 

काही नेते दोन दगडांवर पाय ठेवतात - रोहित पवार

रोहित पवार यांनी या कार्यक्रमात काही नेते दोन दगडांवर पाय ठेवतात असं सांगत इशारा दिला. "काही लोक आणि कदाचित मीसुद्ध मी किंगमेकर, सेनापती आहे असं म्हणेन. पण हे एक दोन सेनापतीचं हे काम नव्हतं. महाराष्ट्रातील तुमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांमुळे हे यश मिळालं आहे. एखाद दुसऱ्या नेत्यामुळे नाही. आपले कार्यकर्ते मजबूत कसे होतील यासाठी विचार केला पाहिजे. काही नेते दोन दगडांवर पाय ठेवतात. त्यांना तिकडे तरी जा किंवा इकडे तरी या असं सांगायला हवं. दोन दगडांवर पाय ठेवून चालणार नाही," असं रोहित पवार म्हणाले आहेत.

जयंत पाटील आणि रोहित पवारांच्या विधानानंतर पक्षात बंडखोरी सुरु असल्याच्या चर्चांना  उधाण आलं आहे. जयंत पाटील यांच्या विधानाबाबत सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आलं असता त्यांनी म्हटलं की, "याचा अर्थ आमच्या पक्षात किती लोकशाही आहे ते पाहा. याउलट तुम्ही आमचं कौतुक केलं पाहिजे".