शरद पवारांचं CM शिंदे, फडणवीस, अजित पवारांना पत्र! केंद्राच्या अहवालाचा उल्लेख करत म्हणाले, "महाराष्ट्राच्या..."

Sharad Pawar Letter: शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या या पत्राची एक एक प्रत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबरच शिंदे सरकारमधील एका महत्त्वाच्या खात्याच्या मंत्र्याला पाठवण्यात आली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 14, 2023, 10:08 AM IST
शरद पवारांचं CM शिंदे, फडणवीस, अजित पवारांना पत्र! केंद्राच्या अहवालाचा उल्लेख करत म्हणाले, "महाराष्ट्राच्या..." title=
शरद पवार यांनी सोशल नेटवर्किंगवरुन शेअर केलं हे पत्र

Sharad Pawar Letter To CM Shinde: केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शैक्षणिक अहवालामध्ये शिक्षणाच्या दर्जाच्या बाबतीत महाराष्ट्राची 5 स्थानांनी घसरण झाल्याचा उल्लेख करत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. यासंदर्भातील एक पत्रच पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठवलं आहे. या पत्राची प्रत शरद पवार यांच्या ट्वीटर हॅण्डलवरुन सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. खालावत जाणारा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी वेळीच उपाययोजना करायला हव्यात. या सर्व बाबींचा विचार करता राज्य शासन आणि विशेषतः शालेय शिक्षण मंत्रीमहोदयांनी याचा गांभीर्याने विचार करावा, असं शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना तसेच शिक्षणमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

शैक्षणिक विकासाच्या दृष्टीकोनातून ही अत्यंत चिंताजनक बाब 

"सक्षम शैक्षणिक व्यवस्था ही समाज सुधारण्यास कारणीभूत ठरत असते. महाराष्ट्रात अण्णाभाऊ साठेंसारख्या अनेक शिक्षणमहर्षींनी हेच तत्व ओळखून सक्षम शालेय व्यवस्था उभारण्याला प्राधान्य दिले. मात्र आजच्या काळात राज्यातील शाळा व्यवस्थापनाचा दर्जा खालावला जाणे ही महाराष्ट्राच्या गुणवत्तादायी शैक्षणिक परंपरेला गालबोट लावणारी बाब आहे," असं म्हणत शरद पवार यांनी राज्यातील शिक्षण व्यवस्थेसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. "केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी प्रसिद्ध केलेल्या परफॉर्मेंस ग्रेडिंग इंडेक्स 2.0 (पी जी आय) अहवालानुसार महाराष्ट्र राज्याची दुसर्‍या स्थानावरून थेट सातव्या स्थानावर घसरण झाली आहे. राज्याच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासाच्या दृष्टीकोनातून ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. ज्या निकषांच्या आधारे हे मूल्यमापन केले जाते त्यामध्ये अध्ययन निष्पत्ती व गुणवत्ता, पायाभूत सुविधा, बदलती शैक्षणिक प्रक्रिया आदी मुद्द्यांचा समावेश होतो. परंतु परफॉर्मेंस ग्रेडिंग इंडेक्स 2.0 (पी जी आय) अहवालानुसार महाराष्ट्रात या महत्वपूर्ण घटकांना गांभीर्याने घेतले गेल्याचे दिसून येत नाही," असं म्हणत अहवालातील निरिक्षणांकडे पवार यांनी सरकारचं लक्ष वेधलं आहे.

गंभीर दाखल घेणे अतिशय गरजेचे

"राज्य म्हणून शैक्षणिक गुणवत्तेत आपण खूपच मागे पडलो आहोत, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शिक्षण विभागाने, मागील वर्षी ‘दोन शिक्षकी शाळांचे सक्षमीकरण’ या विषयावर एका दिवसाची परिषद घेऊन काही निरीक्षणे नोंदविली होती. यासोबतच बदलत्या शैक्षणिक धोरणांच्या दृष्टीकोनातून काही सूचना देखील केल्या होत्या. राज्यात जिल्हा परिषदेच्या जवळपास 38 हजार दोन शिक्षकी शाळा आहेत. त्या प्रामुख्याने वाड्या-वस्त्यांवर असून विद्यार्थी पट संख्या कमी असल्याने त्या बंद करण्याची चर्चा अधून-मधून होत असते, शासनाने त्याची गंभीर दाखल घेणे अतिशय गरजेचे आहे," अशी सूचना शरद पवार यांनी या पत्रातून केली आहे.

लवकरात लवकर बैठक बोलावून...

"खालावत जाणारा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी वेळीच उपाययोजना करायला हव्यात. या सर्व बाबींचा विचार करता राज्य शासन आणि विशेषतः शालेय शिक्षण मंत्रीमहोदयांनी याचा गांभीर्याने विचार करावा. याबाबत सर्व संबंधितांची लवकरात लवकर बैठक बोलावून आवश्यक कृती कार्यक्रम तयार करावा. शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत अग्रस्थानी आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा आहे," असं पवार यांनी पत्राच्या शेवटी म्हटलं आहे.

या पत्राची एक प्रत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांना पाठवण्यात आली आहे.