फडणवीसांची थेट अमित शाहांकडे तक्रार! सुप्रिया सुळे म्हणाल्या, "महाराष्ट्रातही..."

Supriya Sule Slams Home Ministry Mentions Amit Shah: सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांमध्ये निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती आणि समोर येत असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांचा उल्लेख करत सरकारला लक्ष्य केलं.

Updated: Jun 9, 2023, 12:22 PM IST
फडणवीसांची थेट अमित शाहांकडे तक्रार! सुप्रिया सुळे म्हणाल्या, "महाराष्ट्रातही..." title=
सुप्रिया सुळे मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत होते

Supriya Sule Slams Home Ministry Mentions Amit Shah: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी ट्विटरवरुन जीवे मारण्याची धमकी (Sharad Pawar Death Threat) मिळाल्यानंतर शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज्यातील तसेच केंद्रातील गृहमंत्रालयालवर निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळेंनी पवारांना मिळालेल्या धमकी प्रकरणामध्ये मुंबईच्या पोलिस आयुक्तांची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवारांच्या सुरक्षेची जबाबदारी ही केंद्रीय आणि राज्यातील गृहमंत्रालयाची असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं. यावेळेस सुप्रिया सुळेंना मागील काही दिवसांपासून राज्यात घडत असलेल्या गुन्ह्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना राज्यात लक्ष घालावं अशी मागणी केली.

महाराष्ट्रात अस्वस्थता निर्माण केल्याने...

हिंदू-मुस्लिम तणावाचं वातावरण दिसतंय मागील काही दिवसांमध्ये तुम्ही याकडे काही राजकीय दृष्टीने पाहताय का असा प्रश्न सुप्रिया सुळेंना पत्रकारांनी विचारला. यावर उत्तर देताना सुप्रिया सुळेंनी, "शक्यता नाकारता येत नाही," असं उत्तर दिलं. तसेच पुढे बोलताना, "ही सरकारची जबाबदारी असते. सरकारचं इंटेलिजन्स असतं. आम्हीही अनेक वर्ष सत्तेत राहिलो आहोत. काही दिवस नाही तर अनेक महिनेही हे इंटेलिजन्स मिळत असतं. बंटी पाटील दोन महिन्यांपूर्वी कोल्हापूरबद्दल एका पत्रकार परिषदेत बोलले होते. बंटी पाटील यांना कळतं पण गृहमंत्रालयाला कळत नाही या इंटेलिजन्सबद्दल. सोयीप्रमाणे यांचं इंटेलिजन्स फेल्युअर होतंय असं दिसतंय. महाराष्ट्रात अस्वस्थता निर्माण केल्याने कोणाला काही मिळणार नाही. राज्यात गुंतवणूक येणार नाही, विश्वासाच्या नात्याने जे लोक महाराष्ट्रात राहतात त्यांना किती असुरक्षित वाटेल. हा कोणत्याही समाजाची नाही तर नागरिकांचा विषय आहे," असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

पवारांची सुरक्षा वाढवण्याची मागणी?

शरद पवारांसाठी सुरक्षेची मागणी केली आहे का? असा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना सुप्रिया सुळेंनी, "शरद पवारांची सुरक्षा हा गृहमंत्रालयाचा विषय आहे. ते देशाचे नेते आहेत. त्याबद्दल गृहमंत्रालयाने लक्ष घालावं. याबद्दल मी काय सांगणार?" असा प्रतिप्रश्न विचारला. शरद पवारांची सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे का असं विचारलं असता, "मी जी धमकी आलीय त्याबद्दल तक्रार केली त्यावर त्यांनी लवकरच कारवाई करु असं आश्वासन दिलं आहे," असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढतेय हे गृहमंत्रालयाचं अपयश

मुंबईतील हॉस्टेलमधील तरुणीची हत्या, मीरा रोडमधील हत्याकांडप्रकरणाचा संदर्भ देत कायदा सुव्यवस्था ढासाळली आहे. गृहमंत्री अपयशी ठरलेत का? असा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. यावर सुप्रिया यांनी, "अर्थातच हे गृहमंत्रालयाचं अपयश आहे. ज्या पद्धतीने लिव्हइन पार्टनरची हत्या केली जाते. ज्या पद्धतीने तो तिच्या मृतदेहाचे तुकडे शिजवत होता हे मी चॅनेलवरच बातम्यांमध्ये पहिलं. किती क्रूर आहे ही गोष्ट. हॉस्टेलमध्ये घडलेली घटनाही क्रूर आहे. बेटी बचाव बेटी पढाओचे नारे देता. मग या देशातील मुलींसाठी तुम्ही करताय तरी काय? ज्या मुलींनी आपल्याला मेडल आणलं त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचायला 2 महिने लागले? हा मुलींना मिळालेला न्याय आहे का? या मुलींवर अन्याय होतोय. यांचं सरकार आल्यानंतरच हे होतंय. कुठेतरी मुली पळून जायच्या घटना होतात, मग सरकार करतंय तरी काय?" असे प्रश्न सुप्रिया सुळेंनी विचारला.

"मी अमित शाहांकडेही मागणी करते की..."

"महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी वाढत आहे. म्हणून मी अमित शाहांकडेही मागणी करते की कृपया महाराष्ट्रातही लक्ष द्या. महाराष्ट्रातील गृहमंत्रालयामध्ये काय सुरु आहे?" असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांकडे असलेल्या मंत्रालयाची दखल थेट केंद्राने घ्यावी अशी मागणी केली. निलेश राणेंचं ट्विटही चर्चेत आहे असं म्हणत सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारला असता त्यांनी, "मी ते ट्विट वाचलेलं नाही," असं म्हणत त्यांनी उत्तर देणं टाळलं. तसेच आपल्याला जे काही सांगायचं आहे ते आपण पोलिस आयुक्तांना सांगितलं आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी शरद पवारांना देण्यात आलेल्या धमकी प्रकरणात तातडीने चौकशी करण्याचं आश्वासन दिल्याचंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.