शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी! "जर काही झालं तर..."; सुप्रिया सुळेंचा इशारा

Sharad Pawar Death Threat: सुप्रिया सुळे यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना या प्रकरणाबद्दल भाष्य केलं. यावेळेस त्यांनी राज्य तसेच केंद्र सरकारकडे पवारांच्या सुरक्षेची जबाबदारी असल्याचं म्हटलं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 9, 2023, 01:08 PM IST
शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी! "जर काही झालं तर..."; सुप्रिया सुळेंचा इशारा title=
सुप्रिया सुळेंनी घेतली मुंबई पोलिस आयुक्तांची भेट

Supriya Sule On Sharad Pawar Death Threat: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर त्यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आक्रामक भुमिका घेत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवारांना धमकी मिळाल्यानंतर सुप्रिया सुळेंनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांची भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. यावेळेस एका प्रश्नाला उत्तर देताना या प्रकरणात पुढे काही विपरित घडलं तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही सरकारची असेल असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. यावेळेस त्यांनी शरद पवारांच्या सुरक्षेची जबाबदारी ही केंद्रीय आणि राज्यातील गृहमंत्रालयाची असल्याचंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळेंनी केलेल्या या तक्रारीनंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना मिळालेल्या धमकी प्रकरणात तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

सुप्रिया सुळेंनी शरद पवारांना सोशल मीडियावरुन आलेल्या धमक्यांच्या स्क्रीनशॉटचे प्रिंट प्रसारमाध्यमांना दाखवले. "मला व्हॉट्सअपवर हा मेसेज आला. कुठल्या तरी अकाऊंटवरुन अशी एक धमकी दिली जात आहे. त्याचे जे फॉलोअर्स आहेत त्यांच्याही अशा काही कमेंट्सही आल्या आहेत. या कमेंट्स आक्षेपार्ह आहेत. अशा धमक्या आल्या असतील तर गृहमंत्रालयाने याची तातडीने नोंद घ्यावी. हा विषय मी आज मुंबईच्या पोलिस आयुक्तांपर्यंत कळवला आहे. पवारांबद्दल आलेली धमकी दुर्देवी आहे. राजकारणामध्ये मतभेद नक्की असतात. पण इतका द्वेष पसरवला जातोय, हे फार दुर्देवी आहे," असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. "हा द्वेष कशासाठी पसरवला जात आहे? हे गुंडाराज आहे. असं असेल तर याविरुद्ध तातडीने कारवाई केली पाहिजे अशी माझी मागणी आहे," असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

"जर काही झालं तर..."

"या धमकीचा पाठपुरावा करुन जो काय न्याय आहे तो आम्हाला मिळालाच पाहिजे, मी एक महिला म्हणून आणि नागरिक म्हणून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या गृहमंत्र्यांकडे न्याय मागतेय. तुम्ही मला न्याय द्यावा या अपेक्षेने मी आले आहे. जर काही झालं तर त्याला महाराष्ट्राचं आणि देशाचं गृहमंत्रालय जबाबदार असेल," असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पवारांची सुरक्षा वाढवण्याची मागणी केली का?

शरद पवारांसाठी सुरक्षेची मागणी केली आहे का? असा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना सुप्रिया सुळेंनी, "शरद पवारांची सुरक्षा हा गृहमंत्रालयाचा विषय आहे. ते देशाचे नेते आहेत. त्याबद्दल गृहमंत्रालयाने लक्ष घालावं. याबद्दल मी काय सांगणार?" असा प्रतिप्रश्न विचारला. शरद पवारांची सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे का असं विचारलं असता, "मी जी धमकी आलीय त्याबद्दल तक्रार केली त्यावर त्यांनी लवकरच कारवाई करु असं आश्वासन दिलं आहे," असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी आल्यासंदर्भात सुप्रिया सुळेंनी तक्रार केल्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, "महाराष्ट्रात एक उच्च परंपरा आहे. राजकीय मतभेद असले तरी मनभेद नाहीत. कोणत्याही नेत्याला धमक्या देणं किंवा समाजमाध्यमांवर व्यक्त होताना मर्यादा ओलांडणं हे खपवून घेणार नाही. अशा प्रकरणांमध्ये पोलिस निश्चितपणे कायद्यानुसार कारवाई करतील," म्हटलं आहे.