Maharashtra Political Crisis: "काही दिवसांपूर्वी शरद पवारांनीच आम्हाला....," छगन भुजबळांचं मोठं विधान

Maharashtra Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) महाराष्ट्र सरकारमध्ये (Maharashtra Government) सहभागी झाले असल्याने महाराष्ट्राला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी पक्षातील अनेक मोठे नेते गेल्याने यामागे शरद पवार नाहीत ना? अशी शंका व्यक्त होत आहे. त्यातच आता छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मोठं विधान केलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 2, 2023, 04:46 PM IST
Maharashtra Political Crisis: "काही दिवसांपूर्वी शरद पवारांनीच आम्हाला....," छगन भुजबळांचं मोठं विधान title=

Maharashtra Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) महाराष्ट्र सरकारमध्ये सहभागी झाले असल्याने महाराष्ट्राला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी पक्षातील अनेक मोठे नेते गेल्याने यामागे शरद पवार नाहीत ना? अशी शंका व्यक्त होत आहे. त्यातच आता छगन भुजबळ यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवार यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केलं. तसंच आम्ही राष्ट्रवादी पक्ष म्हणूनच सहभागी झालो आहोत असं सांगितलं आहे. 

"महाराष्ट्र सरकारचा तिसरा घटक म्हणून आम्ही सहभागी झालो आहोत. आम्ही राष्ट्रवादी पक्ष सोडलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आम्ही सहभागी झालो आहोत. गेल्या काही दिवसांपासून अनेक चर्चा सुरु होत्या, त्याबद्दल मी सविस्तर सांगणार नाही. पण जर राज्यातील शेतकरी, बेरोजगार यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर भांडून चालणार नाही. सकारात्मकपणे काम करावं लागेल अशी आमची चर्चा झाली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आम्ही अनेक वेळा टीका केली. पण त्यांच्या हातात अतिशय मजबूतणे देशाचं नेतृत्व सुखरुप आहे," असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. 

Ajit Pawar Deputy CM Live : अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्षावरती थेट दावा 

 

"महाराष्ट्र किंवा भारत सरकार विकासाच्या कामाला ताबडतोब निर्णय घेऊन समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे. ओबीसीचे तर अनेक प्रश्न आहेत. ते सोडवायचे असतील तर केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय असला पाहिजे. सरकारमध्ये राहून हे प्रश्न सोडवता येणार आहेत," असं भुजबळांनी सांगितलं. 

पुढे ते म्हणाले की "पाटण्यात विरोधी पक्षांची बैठक झाली. पण तिथे काही समन्वय नसल्याचं पाहिलं. खरं सांगायचं तर शरद पवारांनी आम्हाला काही दिवसांपूर्वी 2024 मध्येही पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीच येणार आहेत असं सागंतिलं. आता तसं असेल तर आपण सकारात्मक विचार घेऊन त्यांच्यासह गेलं पाहिजे आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यास सरकारला मदत केली पाहिजे. रस्त्यावर भांडून प्रश्न सुटणार नाहीत. सरकारमध्ये राहून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करु. आमच्यावर केसेसे आहेत म्हणून पाठिंबा दिल्याचा आरोप चुकीचा आहे".

सकाळी नेमकं काय घडलं?

आज सकाळी 11 वाजल्यापासूनच राज्यात वेगवान घडामोडी सुरु झाल्या होत्या. सर्वात आधी अजित पवारांचे पीए राजभवनात दाखल झाले होते. यानंतर देवेंद्र फडणवीसही सागर बंगल्यावरुन राजभवनासाठी निघाले. यामुळे एकच चर्चा सुरु झाली होती. काही वेळातच छगन भुजबळ आणि राष्ट्रावादीचे इतर आमदार पोहोचल्यानंतर चित्र स्पष्ट झालं. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे पोहोचल्यानंतर सर्वात शेवटी अजित पवार दाखल झाले आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासह एकूण 9 आमदारांचा शपथविधी यावेळी पार पडला.

अजित पवार नाराज का?

शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडत असल्याची घोषणा केल्यानंतर अजित पवार वगळता सर्वांनीच त्यांच्या निर्णयाला विरोध दर्शवला होता. तेव्हापासूनच अजित पवार यांच्या नाराजीची चर्चा सुरु झाली होती. दरम्यान, शरद पवार यांनी पक्षांतर्गत विरोधानंतर निर्णय़ मागे घेतला होता. त्यानंतर अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी आपली इच्छा नसताना विरोधी पक्षनेतेपद दिलं असून, आपल्याकडे पक्षांतर्गंत इतर जबाबदारी द्यावी अशी मागणी केली होती. तसंच आपल्याला प्रदेशाध्यक्षपदी काम करण्याची इच्छा असल्याचं सूचक विधान केलं होतं. यासाठी त्यांनी अल्टिमेटमही दिला होता. यानंतर अखेर आज त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे.