माढा जिंकण्यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न, संजय शिंदेंनी दिलं खुलं आव्हान

राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांनी दिलं खुलं आव्हान...

Updated: Apr 11, 2019, 05:54 PM IST
माढा जिंकण्यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न, संजय शिंदेंनी दिलं खुलं आव्हान title=

माढा : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला माढा लोकसभा मतदारसंघात जिंकण्यासाठी भाजपकडून आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीमधील नेत्यांना भाजपात आणून माढा जिंकण्याची तयारी सुरू आहे. भाजप उमेदवारास एक लाख मताचे लीड मोहिते पाटलांनी दिले तर राजकारण सोडून देण्याची भाषा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांनी केली आहे.

काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रणजितसिंह मोहिते पाटील यांनी एकट्या माळशिरस तालुक्यातून भाजप उमेदवार रणजिसिंह नाईक निंबाळकर यांना एक लाख मताचे लीड देण्याचा विडा उचलला आहे. माळशिरस सोबतच सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा, सांगोला मधूनही राष्ट्रवादीने लीड मिळेल या भ्रमात राहू नये असा सल्ला दिला आहे.

मात्र राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार संजय शिंदे यांनी मोहिते पाटील यांच्या घोषणेतील हवाच काढून घेतली आहे. २०१४ ला सदाभाऊ खोत असतानाही विजयसिंह मोहिते पाटील यांना माळशिरस तालुक्यातून ३८ हजार मताचे लीड मिळाले होते.

मोहिते पाटील यांनी माळशिरस तालुक्यातून एक लाख मताचे लीड भाजप उमेदवाराला द्यावे. मी राजकारण सोडून देतो असं खुल आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार संजय शिंदे यांनी मोहिते पाटील यांना दिले आहे. माढा मतदारसंघात निवडणूक मोहिते पाटील विरुद्ध शिंदे अशीच होणार असल्याची सध्याची तरी परिस्थिती आहे.