नागपूर : राज्यातल्या भाजप शिवसेना सरकारविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्ष हिवाळी अधिवेशनात विधानभवनावर जनआक्रोश हल्लाबोल मोर्चा काढलाय. राष्ट्रवादीचा अध्यक्ष शरद पवारांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला. या मोर्चातून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे.
या सरकारवर हल्लाबोल करून त्यांना जागं करावं लागेल. प्रचारसाठी पाकिस्तानच्या नावाचा गैरवापर भाजप सरकार करत आहे. आज देशात वेगळे चित्र बघायला मिळते आहे. आज देशात शेतकरी, तरुणांचे प्रश्न आहेत, मात्र देश दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न आहे. मनमोहन सिंग यांच्याबद्दल जगात कुणी शंका घऊ शकत नाही. पण त्याच्यावर आरोप केले गेले पाकिस्तानशी संगनमत केल्याचा आरोप करताना लाज वाटली पाहिजे. देशाची परंपरा धुळीस मिळवण्याचे काम सुरू आहे.
लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचे आणि लोकांचा संताप टाळण्यासाठी पाकिस्तानचा मुद्दा उपस्थित करायचा, साडेतीन वर्षापूर्वी शेतकर्यांची कर्जमाफी करू असे सांगितले होते, पण त्याकडे दुर्लक्ष करत आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत. आम्ही २००७ साली १५ दिवसात कर्जमाफी केली. गेली सहा महिने देवेंद्र फडणवीस सांगतायत आम्ही कर्जमाफी देणार आहोत. पण कधी देणार? आता सरकारचे कोणतेही देणे देणार नाही, वीजेचे बिल देणार नाही असा निर्धार आपण केला पाहिजे. शेतकरी अडचणीत सापडला आहे आणि हे सरकार सक्तीची वसुली करत आहे. या सरकारने आमच्या शेतमालाला भाव दिला नाही, शेतकरी अडचणीत आहे, त्यामुळे तुम्ही निर्धार करा. मी मुख्यमंत्र्यांना सांगतो आम्ही काय केले. मनमोहन सिंग याच्या काळात आणि मी कृषी मंत्री असताना या देशात सगळ्यात जास्त अन्नधान्य उत्पादन झाले, त्याची दखल जागतिक संस्थानी घेतली. मुख्यमंत्री दमदाटी करून सामान्यांचा आवाज दाबायचा प्रयत्न करत आहेत. ही जनता तुमची सत्ता उलथवून टाकेल.
आम्ही शेतकर्यांची बाजू मांडत असताना मुख्यमंत्री सांगत होते मी पाच पिढ्यांच्या शेतकरी आहे. तुम्ही सर्व बाजूने मुख्यमंत्र्यांना बघा ते शेतकरी वाटतात. मुख्यमंत्री म्हणतात मी गाईचे दूध काढले आहे. मला साहेब परवानगी द्या मी मुख्यमंत्र्यांच्या घरी गाय घेऊन जातो मुख्यमंत्र्यांनी दुध काढून दाखवावे. मुख्यमंत्री म्हणतात तुम्ही १५ वर्ष काय केलं. मी म्हणतो तीन वर्षापूर्वी जनतेने तुमचे लग्न सत्तेशी लावले मग तुम्हाला जनकल्याणाचे पोर होत नाही त्याला आम्ही काय करणार. तुम्हाला देवेंद्र फडणवीस म्हणावे की देवेंद्र फसवणीस? सगळे शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. - धंनजय मुंडे
पार्टीच्या कार्यकर्त्यांना एकत्र पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सरकारची झोप उडाली असणार. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपली एकी कायम ठेवावी, २०१९मध्ये सत्तांतर नक्कीच होईल. युपीएच्या कालखंडापेक्षा ४० टक्के कमी भाव शेतमालाला आज मिळत आहे. विदर्भातील शेतकरी देशोधडीला लागला आहे. कापसाचे बोंड आळीमुळे नुकसान झाले आहे, मात्र सरकार काहीच करत नाही. विदर्भात राज्याचे महत्त्वाचे मंत्रीपद असूनही इथे एकही नवीन योजना नाही. पंतप्रधान मोदी यांनी देशात ज्या गुजरात मॉडेलचा प्रचार केला त्या गुजरातमध्येही भाजपच्या पायाखालची जमीन सरकली आहे. या देशात परिवर्तनाचे वारे वाहायला लागले आहे. गुजरातमध्ये सत्तांतर झाले तर त्यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही. - प्रफुल्ल पटेल
जे या देशातील लोकांना खोटी आश्वासने देतात त्यांना जनता माफ करणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळमध्ये आश्वासन दिले होते की, शेतीसाठी जो खर्च केला जाईल तो खर्च शेतक-यांना दिला जाईल आणि त्यावर आणखी फायदा दिला जाईल. पण आज मोदींच्या सरकारला साडे तीन वर्ष झाले. कुठे गेली त्यांनी केलेली आश्वासने? शेतक-यांसोबत खोटं बोलणं हा देशाचा अपमान आहे. त्यासाठी त्यांना कधीही माफ केलं जाऊ शकत नाही - गुलाब नबी आझाद