नवी मुंबईतील सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाला 32 लाखांचा गंडा, पुलवामा हल्ल्यात संबंध असल्याचे सांगत फसवणूक

 नेरुळमध्ये राहणाऱ्या एका 82 वर्षीय सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 32 लाख 13 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. 

Updated: May 22, 2024, 12:54 PM IST
नवी मुंबईतील सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाला 32 लाखांचा गंडा, पुलवामा हल्ल्यात संबंध असल्याचे सांगत फसवणूक title=

Navi Mumbai senior citizen cheated : नवी मुंबईतील नेरुळमध्ये राहणाऱ्या एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 32 लाखांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुलवामा हल्ल्याप्रकरणी तुमचा संबंध असल्याचे सांगत ही फसवणूक करण्यात आली. यापक्ररणी नवी मुंबई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

देशद्रोह आणि ड्रग्स तस्करीसारखे गंभीर गुन्हे दाखल

नवी मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेरुळमध्ये राहणाऱ्या एका 82 वर्षीय सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 32 लाख 13 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. शरद पाटील असे या व्यक्तीचे नाव आहे. पुलवामा हल्ल्यात संबंध असल्याचे भासवून तुमच्यावर देशद्रोह आणि ड्रग्स तस्करीसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे सांगत ही फसवणूक करण्यात आली आहे. ़

चार टप्प्यात स्वीकारण्यात आली रक्कम 

यावेळी आरोपींनी व्हॉट्सअॅपवर काही गोपनीय करारपत्र आणि नार्कोटिक्स डिपार्टमेंटची बनावट कागदपत्र पाठवली होती. ही कागदपत्र खरी असल्याचे शरद पाटील यांना वाटले होते. यादरम्यान आरोपींनी तुमच्यावर गुन्हा दाखल झाला असून याची तपासणी सुरु आहे, असे सांगण्यात आले. यासाठी रिझर्व्ह बँकेकडे पैसे भरावे लागतील, जे खातरजमा झाल्यावर परत मिळतील, असे सांगितले गेले. याप्रकरणी चार टप्प्यात ही रक्कम स्वीकारण्यात आली. 

पोलिसांकडून याप्रकरणाचा अधिक तपास सुरु

यानंतर आरोपींकडून वारंवार पैशांची मागणी होत असल्याने शरद पाटील यांना संशय आला. त्यानंतर त्यांना आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच शरद पाटील यांनी पोलिसात धाव घेतली. यावेळी शरद पाटील यांनी नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या सायबर पोलिसांकडून याप्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.