Nashik Fire : जिंदाल कंपनीतील स्फोटात दोघांचा मृत्यू; 17 जण जखमी, आग अद्याप नियंत्रणाबाहेर

Nashik factory Fire : कंपनीत सातत्याने छोट्या-मोठ्या स्फोटाचे आवाज अद्यापही येत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये ही आग पसरण्याची भीती आता व्यक्त करण्यात येत आहे.

Updated: Jan 1, 2023, 05:03 PM IST
Nashik Fire : जिंदाल कंपनीतील स्फोटात दोघांचा मृत्यू; 17 जण जखमी, आग अद्याप नियंत्रणाबाहेर title=

Nashik factory Fire : नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलीफिल्म प्रकल्पात (poly films factory) बॉयलरचा स्फोट झाल्यानंतर मोठी आग लागली आहे. सकाळच्या सुमारास लागलेली आग अद्यापही नियंत्रणात आलेली नाही. मात्र या आगीत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहित समोर आली आहे. तर 17 जण जखमी झाले आहे. यातील चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी या आगीची माहिती घेत योग्य ती मदत पुरणव्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. दुसरीकडे बचावकार्यासाठी भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टरही तैनात करण्यात आले आहे.

नाशिक मुंबई महामार्गावर असलेल्या जिंदाल कंपनीमध्ये सकाळच्या सुमाराच मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका मोठा होता की या त्याचा आवाज आजूबाजूच्या 20 ते 25 गावांमध्ये ऐकायला मिळाला. आग इतकी मोठी होती की धुराचे मोठ मोठे लोट आकाशात दिसत होते. कंपनीच्या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात अंधार झाल्याचे दिसून आहे. स्फोटानंतर तात्काळ अग्नीशमन दलाच्या गाड्यांनी आगीच्या ठिकाणी धाव घेतली. मात्र आग पसरल्याने ती विझवण्यात मोठ्या अडचणी येत आहेत.

सध्या ही आग आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये पसरताना दिसत आहे. जिल्ह्यातील सर्व अग्निशामक दलाच्या गाड्या आणि ॲम्बुलन्स या कंपनीत पाठवण्यात आल्या आहेत. या कंपनीत एकूण 15000 कर्मचारी काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी पॉलिफिल्मची ही कंपनी असून अनेक कामगार यामध्ये अडकले आहेत. जखमींना सुयश हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. दरम्यान, कंपनीतील इंधनाच्या टाकीला आग लागल्यास मोठी हानी होऊ शकते. त्यामुळे सावधरित्या इतर कामगारांनाही बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले की, आग मोठ्या प्रमाणात पसरत आहे. कंपनीत असलेल्या असलेल्या कच्च्या मालाच्या प्रकारामुळे आग सतत पसरत आहे. आग विझवण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. सध्या आगीचे कारण समजू शकलेले नाही. सकाळी 11 च्या सुमारास कारखान्यात मोठा स्फोट होऊन येथे आग लागली. कामावर असलेल्या कामगारांना काही समजेपर्यंत आग पसरू लागली.