'जॅग्वार'मधून अंमली पदार्थांचा व्यापार, नाशिकमध्ये दोघांना अटक

नाशिक पोलिसांनी सध्या अंमली पदार्थांवर आपलं लक्ष केंद्रीत केलंय.

Updated: May 28, 2018, 10:28 PM IST

किरण ताजणे झी मीडिया, नाशिक : नाशिक पोलिसांनी सध्या अंमली पदार्थांवर आपलं लक्ष केंद्रीत केलंय. जॅग्वार या आलीशान कारमधून अंमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्या दोघांना अटक केल्यावर आता एमडी ड्रग्ज बनवण्याचा कारखानाच पोलिसांनी उध्वस्त केलाय. दोन आठवड्यांपूर्वी पाथर्डी फाटा येथे सफारी कारमधून रणजित मोरे आणि पंकज दुंडे आणि नितीन माळशेदे या तिघांना अटक केली होती. त्यांच्याकडून २६५ ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि सफारी कार असा १५ लाखांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला होता. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये तिघांविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी मुंबईतील काही संशयितांची माहिती मिळाली. त्यानुसार मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथून नदीम सलीम सौरठिया आणि सफैउल्ला फारुख शेख या दोघांना ४४ लाख रुपयांच्या एमडी ड्रग्जसह अटक केली होती. त्यांच्याकडून ८० लाख रुपये किमतीची एमएच ०२ डीएन ५०५० क्रमांकाची जॅग्वार कार जप्‍त केलीये.

या कारवाईमुळे नाशिक पोलिसांनी चार दिवसांत पाच संशयितांना अटक करून त्यांच्याकडून ५० लाख रुपयांचे सुमारे अडीच किलो एमडी ड्रग्ज जप्‍त केलेय. ड्रग्ज विक्रीसोबतच उत्पादन कुठे होते याचा तपास करताना हे ड्रग्स ते ज्या व्यक्तीकडून खरेदी करत होते तो अरविंद कुमार मुझफ्फरनगरमध्ये फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी क्राईम ब्रँचचं एक पथक मुझफ्फरनगरला रवाना झालं होतं आणि अखेर सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळण्यात त्यांना यश आलं. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच साथीदाराच्या मदतीनं त्याने बोईसर मध्ये एका घरातच एमडी ड्रग्स बनवण्याची प्रयोगशाळा सुरु असल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांच्या दुसऱ्या पथकाने बोईसर गाठत अरविंदकुमारचा साथीदार हरिश्चंद्र पंत याला ताब्यात घेत, ४५०० ग्रॅम एमडी ड्रग्ज, एम डी तयार करण्यासाठी लागणारी १८ किलो क्रूड पावडर आणि प्रयोगशाळेतील इतर साहित्य असा एकूण १ कोटी ८० लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. 

राज्यात अमली पदार्थ विरोधी यंत्रणा तैनात असताना नाशिक पोलिसांनी ही टोळी उध्वस्त केलीय. त्यातच मध्य प्रदेश सीमेवर नाशिकमध्ये येणारा गांजाही पकडण्यात आलाय. त्यामुळे नाशिक अंमली नशेचं मुख्य केंद्र बनल्याचं समोर येतंय.