Video : शिकार करायला गेला अन् स्वतःच फसला; कोंबडीच्या खुराड्यात अडकला बिबट्या

Leopard Attack : वनविभागाने बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं आहे. तर बिबट्याच्या बछड्याला कोंबड्याची शिकार करणे चांगलंच महागात पडल्याचं म्हटलं जात आहे.

आकाश नेटके | Updated: Aug 11, 2023, 01:38 PM IST
Video : शिकार करायला गेला अन् स्वतःच फसला; कोंबडीच्या खुराड्यात अडकला बिबट्या title=

निलेश वाघ, झी मीडिया, नाशिक : गेल्या काही दिवसांपासून मानवी वस्तील बिबट्या (leopard) शिरल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मानवी वस्तीत घुसून बिबट्या लोकांवर हल्ला करत जखमी केल्याचे समोर आले आहे. अशातच कोंबड्यांची शिकार करण्यासाठी गेलेला बिबट्या कोंबड्यांच्या खुराड्यातच (chicken cage) अडकल्याची घटना नाशिकमध्ये (Nashik News) समोर आली आहे. नाशिकच्या कळवण तालुक्यातील नवी बेज शिवारात हा सगळा प्रकार घडला आहे.

कळवण तालुक्यातील नवी बेज गावाच्या शिवारात एका शेतामध्ये बुधवारी पहाटेच्या सुमारास कोंबड्यांची शिकार करण्यासाठी गेलेल्या बिबटा कोंबड्यांच्या खुराड्यात अडकला होता. परिसरात बिबट्याच्या गुरगुरणे आणि डरकाळ्या फोडणे सुरू होताच शेतकऱ्याने खुराड्याजवळ धाव घेतल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी वनखात्याला माहिती कळविली. वनाधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी साधनसामुग्रीसह धाव घेतली.

कोंबड्याच्या खुराऱ्यात बिबट्या अडकल्याचे कळताच शेतकऱ्याने खुराड्याजवळ धाव घेतली आणि खुराडा व्यवस्थित बंद केला. त्यानंतर लाकडीच्या सहाय्याने तो पिंजरा उचलून शेतातून बाहेर आणला. शेतकऱ्याने वनखात्याला याबाबत माहिती दिली. बिबट्याची माहिती मिळताच कळवण वनपरिक्षेत्राचे पथक मोठ्या पिंजऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले. वनाधिकारी, कर्मचाऱ्यांनी साधनसामुग्रीसह घटनास्थळ गाठत बिबट्याला बेशुद्ध केले. त्यानंतर त्याला कोंबड्यांच्या खुराड्यातून मोठ्या पिंजऱ्यात स्थलांतरित करून जेरबंद केले. दीड वर्ष वयाच्या या बिबट्याच्या बछड्याला नैसर्गिक अधिवासात सोडणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे. बिबट्याचा बछडा नर असून त्याची प्रकृती चांगली आहे, असेही वनविभागाने सांगितले.

सिन्नर तालुक्यात मुलीवर बिबट्याचा हल्ला

नाशिक जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढला असताना नागरिकांवर हल्ले वाढले आहेत. काही दिवसांपूर्वी सिन्नर परिसरात सात वर्षाच्या बालिकेवर बिबट्याने हल्ला केल्याने ती जखमी झाली होती. सिन्नर तालुक्यातील दापूर परिसरातील गोनाई मळा येथे हा सगळा प्रकार घडला होता. घराजवळील शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने मुलीवर हल्ला केला. हा प्रकार तिच्या मोठ्या बहिणीने घरातून पाहिला होता. तिने आरडाओरड केल्याने बिबट्याने मुलीला त्याच ठिकाणी टाकून पळ काढला. या हल्ल्यात बिबट्याने मुलीच्या ओठाखाली तसेच मानेजवळ चावा घेतला होता.