मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा बहाणा, नाशिकच्या महंतांना 40 लाख रुपयांचा गंडा

Nashik : नाशिकच्या गोराराम मंदिराचा जिर्णोधार करण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने तीन संशयितांनी महंतांना चाळीस लाख रुपयांचा गंड घातला आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    

Updated: Jan 19, 2024, 09:54 PM IST
मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा बहाणा, नाशिकच्या महंतांना 40 लाख रुपयांचा गंडा title=

सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक : 22 जानेवारीला अयोध्या नगरीत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratistha) केली जाणार आहे . यासाठी अयोध्या नगरी सजली असून देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. त्याआधी पंतप्रधान मोदी यांनी नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट दिली होती. या मंदिरात पीएम मोदी यांनी पूजा-अर्चाही केली. तसंच सर्व मंदिरात 22 जानेवारीपर्यंत स्वच्छतेची मोहिम राबवण्याचं आवाहन केलं. काळाराम मंदिर हे नाशिकमधलं प्राचीन मंदिर आहे. काळाराम मंदिराप्रमाणेच नाशिकमध्ये गोराराम मंदिरही (GoraRam Mandir) आहे. नाशिक शहरातील पंचवटीत (Nashik) असलेलं हे मंदिरही प्राचीन आहे. पण या मंदिराची जीर्ण अवस्था झाली आहे. 

या मंदिराचा जिर्णोधार करण्यासाठी पैसे कमी पडत असल्याचं सांगत तीन संशयित आरोपींनी मदतीचा बहाणा करून मंदिराच्या महंतांना चाळीस लाख रुपयांना गंडवल्याच प्रकार उघडकीस आला आहे. 

अशी झाली ओळख 
पंचवटीत असलेले काळाराम मंदिर सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र याच ठिकाणी गोराराम मंदिर सुद्धा आहे. हे मंदिर प्राचीन असून मंदिराची सध्या दुरावस्था झाली आहे. या मंदिराचा जीर्णोधार व्हावा अशी अपेक्षा इथं असलेले महंत राजारामदास गुरु श्री शालिग्रामदास वैष्णव (रा. गोरेराम मंदिर, पंचवटी) यांची आहे. मात्र जिर्णोद्धारसाठी पैसे कमी पडत होते. याच मंदिरात भारती युवराज शर्मा (रा. स्वामी नारायण मंदिराजवळ, नाशिक) ही महिला रोज दर्शनासाठी येत होती. या दरम्यान तिची महंत राजारामदास गुरु यांच्याशी ओळख झाली.  भारती शर्मा या महिलेने महंतांची राजू अण्णा चौघुले, रोहन राजू चौघुले (दोघे रा. चौघुले निवास, अशोकनगर, सातपूर) यांची भेट करून दिली. 

अशी झाली फसवणूक
संशयित आरोपींची ओळख झाल्यानंतर मंदिराचा जिर्णोधार करण्यासाठी मदत करणार असल्याचं तीनही संशयित आरोपींनी महंतांना सांगितलं. बिल्डर आपल्या ओळखीचे असून त्यांच्याकडून कमी खर्चात काम करून देण्याचे आश्वासन देऊन महंतांचा विश्वास संपादन केला. यानंतर वेगवेगळं कारण सांगून राजू चौघुले याने महंतांकडून 25 लाख रुपये घेतले. यानंतर खाजगी कामाकरिता त्यांची इनोव्हा कार सुद्धा घेऊन गेले. पुन्हा आर्थिक अडचण असल्याचे सांगून इनोव्हा कार गहाण ठेवली. 

गुन्हा दाखल 
राजू चौघुले यांच्याकडे पैशांची मागणी केली असता त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. पैसे मिळत नसल्याने आपली फसवणूक झाली असल्याच लक्षात आल्यानंतर महंतांनी राजू चौघुले, भारती शर्मा आणि रोहन चौघुले या तिघांविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.