नाशिक : सायकलस्वारांची सलग लांब रेघ अशा स्वरूपाचा बांग्लादेशींनी बनवलेला गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड तोडण्यासाठी नाशिक सायकलस्वार सज्ज झाले आहेत.
सुमारे २००० सायकलस्वारांसह पुढल्या वर्षी हा रेकॉर्ड मोडण्याचा सायकलस्वारांचा मानस आहे.
नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रविण खाबिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ फेब्रुवारी २०१८ रोजी हा विश्वविक्रम रचण्यासाठी त्यांनी रजिस्ट्रेशनदेखील केले आहे. या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये आबालवृद्ध सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. याकरिता शाळा, महाविद्यालयीन मुलांचा प्रतिसाद अपेक्षित आहे.
खाबिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ वर्षावरील महिला, पुरूष, वृद्ध मंडळी यामध्ये सहभागी होऊ शकतात. सायकलस्वारांपैकी ५०% महिला असतील. सहभागी सायकलस्वार सुमारे ३ किमी सायकल चालवणार आहेत. ढाका येथील नॉन प्रॉफिट संस्था बीडी साइकिलिस्ट्स यांनी २०१५ साली सुमारे ११८६ सायकलस्वारांसह ३.२ किमी सायकल चालवून हा विश्वविक्रम केला होता.